तुमची सिस्टीम एवढी सडलीये का? ‘टीईटी’ पेपरफुटीनंतर अमित ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई | भिवंडीत ‘टीईटी’ (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर आणि परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिक्षण खात्यावर अत्यंत तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. “गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र आणि देशातील संधीसाधूंनी परीक्षा हा प्रश्नपत्रिका विकण्याचा अधिकृत धंदा बनवला आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा संयम सुटल्यास ते या भ्रष्ट सिस्टीमचा ‘पेपर’ फाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भित इशाराही त्यांनी सरकारला दिला.
अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, “परवा मध्यरात्री भिवंडीत पोलिसांनी छापा टाकला आणि ‘टीईटी’ परीक्षेचा पेपर फुटल्याचं सिद्ध झालं. परीक्षा पुढे ढकलली गेली, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुण मित्र-मैत्रिणींचं काय?”
देशात गाजलेला ‘NEET’ घोटाळा आणि महाराष्ट्रातील ‘MHT-CET’ च्या निकालांचा दाखला देत त्यांनी धक्कादायक वास्तवाकडे लक्ष वेधले. “ज्या मुलांना १० वी-१२ वीत साधे पासिंग मार्क्स मिळाले होते, ती मुलं चक्क १०० टक्के मिळवून टॉपर येतात! हा कोणता चमत्कार?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. ज्या राज्याला शिक्षणाचा मोठा वारसा आहे, तिथे कॉपी रोखण्यासाठी ड्रोन लावावे लागतात आणि १०७ केंद्रे ब्लॅकलिस्ट करावी लागतात, ही महाराष्ट्राची प्रगती आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
हेही वाचा
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘करो या मरो’ सामना; सेमीफायनलसाठी असे आहे ‘गणितांचे’ समीकरण!
“एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही?”
तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी, नीट, सीईटी आणि आता टीईटी अशा सर्वच परीक्षांचा उल्लेख करत अमित ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी थेट सवाल उपस्थित केला की, “तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडलीये का? सरकारकडून केल्या जाणाऱ्या कडक कायद्यांच्या गप्पा केवळ मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी आहेत का?”
तरुणांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्यांना जेलमध्ये टाका
“आज गरीब आणि मध्यमवर्गीय घरातला तरुण दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून अभ्यास करतोय. त्याची चूक एवढीच की तो लाच देऊन पेपर विकत घेऊ शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांची व्यथा मांडली. सिस्टीमच्या या नालायकीमुळे आज देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चालला असून टोकाचे पाऊल उचलत आहे. मात्र, सरकार स्वतःच्या राजकारणात मग्न आहे, अशी कडक टीका त्यांनी केली.
शेवटी सरकारला इशारा देताना अमित ठाकरे म्हणाले की, “किमान आता तरी तुमचं घाणेरडं राजकारण आणि पोकळ भाषणं बाजूला ठेवा. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका.” तरुणांचा संयम सुटल्यास सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगत त्यांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.





