Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 22 जुलैदरम्यान राज्यात आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन 

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत आहेत. ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत प्रतिबंधात्मक व विशेष आरोग्य सेवा वेळेत पोहोचविण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यात १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान आरोग्य तपासणी आणि विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबिरावर जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्रालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यासंदर्भात समिती गठित करण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त भंडारी, संचालक पल्लवी सापळे उपस्थित होते. तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडे तज्ज्ञ मनुष्यबळ, अत्याधुनिक सुविधा आणि उपलब्ध असलेल्या उपचार क्षमता ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत प्रतिबंधात्मक व विशेष आरोग्य सेवा वेळेत पोहोचविणे आवश्यक आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत रक्तदान, मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, हाडांची घनता (बोन मिनरल डेन्सिटी) तपासणी आणि आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिराचा प्रचार, प्रसार करून शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शिबिराच्या ठिकाणी स्वच्छतेला महत्व द्यावे, ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे उपक्रम राबबावेत. शक्य असेल त्याठिकाणी जिल्हा आरोग्य विभागाकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.

हेही वाचा –  २००५ पूर्वीच्या नियुक्तीचा मोठा विजय! जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र ठरले कर्मचारी; जाणून घ्या न्यायालयाचा संपूर्ण निकाल

शिबिराच्या ठिकाणी तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर याठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयात गरजेनुसार ऑपरेशनची सोय करावी. अवयव प्रत्यारोपण आणि महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी सीएसआर फंडाची मदत घेण्याचे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

शिबिराच्या समन्वयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयस्तरावर अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करावी. समितीमध्ये प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक, निवासी डॉक्टर, वैद्यकीय इंटर्न, परिचारिका कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक वर्गीय कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचा समावेश करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. ही समिती आरोग्य शिबिरांचे नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

शिबिरात काय असणार

-रक्तदान शिबिरात स्वेच्छा रक्तदानास प्रोत्साहन देणे,राज्यातील रक्तसाठा वाढविणे हे उद्दिष्ट

-स्तन कर्करोग तपासणी शिबिर- स्तन कर्करोगाबाबत क्लिनिकल तपासणी आणि आवश्यकतेनुसार उपचार.

-गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून जनजागृती व समुपदेशन करण्यात येणार.

-हाडांची घनता तपासणी (बोन मिनरल डेन्सिटी) शिबिरात गुडघा व खुब्याचा सांधा तपासणी होणार. अस्थिरोग तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येणार.

मुख कर्करोग- तंबाखूमुक्ती जनजागृती,मुख तपासणी व पूर्वकर्करोग अवस्थांचे लवकर निदान यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येणार.

-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर आणि बारामती येथे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता (ओबेसिटी) तपासणी शिबिर होणार.

-अशुद्ध रक्तवाहिन्यांची सूज (व्हेरिकोज व्हेन्स) डॉप्लर तपासणी व उपचार शिबिर कोल्हापूर आणि बारामतीमध्ये होणार.

जनजागृती अभियान

संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी जास्तीत जास्त जनजागृती मोहिमा राबवायच्या आहेत. स्थूलता जनजागृती अभियान, हर्निया आजार, व्हेरिकोज व्हेन्स, थॅलेसेमिया, मधुमेह, वेदनाशामक आधारावर आरोग्यसेवा, मानव दूध बँक, स्तनपान, कृत्रिम अवयव, हृदयविकार यासारख्या असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती प्रत्येक जिल्ह्यामध्ये करावी, अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button