अभिनेत्री संचिता उगले आत्महत्येला वेगळे वळण! “मानसिक छळ आणि पैशांची मागणी…”, कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप

Sanchita Ugale | लोकप्रिय टीव्ही मालिका आणि ‘छावा’ चित्रपटात काम केलेल्या २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्येचे गूढ आता अधिकच वाढले आहे. संचिताचा इंडस्ट्रीमधील कोणीतरी मानसिक छळ करत होते आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता, असा खळबळजनक आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला एक वेगळे वळण दिले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता कुटुंबीयांनी केली आहे.
रविवारी सायंकाळी संचिताने नालासोपारा येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या धक्कादायक घटनेनंतर संचिताच्या कुटुंबाने माध्यमांशी संवाद साधनाना अनेक गंभीर खुलासे केले आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये वरवर सर्व काही ठीक दिसत असले, तरी संचिता गेल्या काही काळापासून प्रचंड मानसिक त्रासातून जात होती. “तिचा कोणीतरी सतत मानसिक छळ करत होते, तिच्यावर दबाव टाकला जात होता, तसेच तिच्याकडे पैशांची मागणीही केली जात होती,” असा थेट आणि गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा
रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सूचवा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
बाहेरून ती नेहमी आनंदी आणि फ्रेश वाटत असली, तरी अचानक ती तीव्र नैराश्यात (Depression) जात असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले होते. याच कारणामुळे तिला कधीही एकटे सोडू नये म्हणून कुटुंबीय नेहमी काळजी घेत असत. ”आम्ही सतत तिच्यासोबत असायचो. पण दुर्दैवाने, रविवारी ज्या अवघ्या अर्ध्या-पाऊण तासाच्या काळात ती घरी एकटी होती, नेमकी त्याच वेळी हा अनर्थ घडला,” अशी खंत तिच्या वडिलांनी व्यक्त केली.
ओळखीच्या व्यक्तीवर संशय आणि पोलीस तपास
संचिताच्या इंडस्ट्रीमधील सहकलाकार किंवा तिच्या ओळखीतीलच कोणीतरी व्यक्ती या मानसिक छळामागे असल्याचा दाट संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. संचिताचा मोबाईल डेटा, तिचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स (CDR) यांची कसून तपासणी केल्यास या प्रकरणातील खरे सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी वर्तवला आहे. सध्या आचोळे पोलीस या सर्व तांत्रिक बाबींचा तपास करत असून या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
प्रशासकांकडे न्यायाची मागणी
भविष्यात ग्लॅमर जगतात काम करणाऱ्या कोणत्याही तरुण मुलीला अशा भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी कुटुंबाने केली आहे. संचिताने तिच्यावर होत असलेल्या या त्रासाबाबत घरच्यांशी एकदा जरी स्पष्टपणे संवाद साधला असता, तर कदाचित तिचे प्राण वाचवता आले असते, अशी आर्त भावना तिच्या वडिलांनी बोलून दाखवली. या गंभीर आरोपानंतर पोलीस आता आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कोनातून तपास करत आहेत.





