Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिका-इराण करारानंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली, पण परिस्थिती पूर्ववत होणार कधी?

Strait of Hormuz | अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या १०० हून अधिक दिवसांपासून सुरू असलेला भीषण लष्करी संघर्ष संपवण्यावर अखेर सहमती झाली आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे युद्ध संपवून दोन्ही देश ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास तयार झाले आहेत. येत्या १९ जून रोजी (शुक्रवार) या करारावर अधिकृतपणे स्वाक्षऱ्या केल्या जातील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केली आहे.

या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय इंधन बाजारातील दबाव काहीसा कमी झाला असून ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ची (Strait of Hormuz) दारे खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, हा मार्ग खुला होणार असला तरी, गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प झालेला जागतिक व्यापार नेमका कधी आणि कसा पूर्ववत होणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

“जगभरातील जहाजांनो, इंजिने सुरू करा!”  डोनाल्ड ट्रम्प

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या महत्त्वपूर्ण कराराची घोषणा करताना म्हटले, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. सर्वांचे अभिनंदन! मी याद्वारे होर्मुझची सामुद्रधुनी कोणतेही शुल्क (टॉल फ्री) न आकारता खुली करण्यास पूर्ण अधिकृतता देत आहे आणि त्याच वेळी अमेरिकन नौदलाची नाकेबंदी तात्काळ हटवण्यासही मंजुरी देत आहे. जगभरातील जहाजांनो, तुमची इंजिने सुरू करा. तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू होऊ द्या!” १९ जून रोजी करारावर औपचारिक स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा निर्णय प्रत्यक्ष लागू होईल.

हेही वाचा

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

२ हजार जहाजे आखातात अडकली

‘अल जझिरा’च्या वृत्तानुसार, सद्यस्थितीत सुमारे २ हजारांहून अधिक व्यापारी जहाजे आखात क्षेत्रात अडकून पडली असून ती पुढे जाण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा करत आहेत. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी जवळपास २० टक्के भाग याच मार्गावरून जातो. त्यामुळे व्यापार पूर्ववत होण्यास किमान काही आठवडे लागतील.

इस्रायलचा शांतता कराराला तीव्र विरोध

अमेरिकेने पुढाकार घेऊन तयार केलेला हा शांतता करार त्यांचा मित्रदेश असलेल्या इस्रायलला मान्य नाही. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्विर यांनी “आम्ही ‘बनाना रिपब्लिक’ नाही, ट्रम्प यांचा करार आमच्यावर बंधनकारक नाही” असे म्हणत युद्ध सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. तर संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी लष्कर मागे न घेण्याचे स्पष्ट केले आहे.

व्यापार पूर्ववत होण्यास जुलै महिना उजाडणार?

१९ जून रोजी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर प्रत्यक्ष नाकेबंदी हटवण्यास सुरुवात होईल. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अडकलेली जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि सागरी मार्गावरील सुरक्षा सुनिश्चित करणे यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आखातातील तणाव निवळला असला तरी जागतिक जहाज वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यास पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button