Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा आगामी १४ जून रोजी वाढदिवस आहे. मात्र, यंदा वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राज ठाकरे मुंबईत हजर नसणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपल्या चाहत्यांना एक अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक आवाहन केले आहे. “यंदा शहरांमध्ये माझ्या शुभेच्छांची मोठी होर्डिंग्स लावून शहरं रंगवण्याऐवजी, हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने आणि लोकोपयोगी उपक्रमांतून साजरा करा,” अशी विनंती राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसिद्ध केलेल्या एका सविस्तर पोस्टद्वारे केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, यावर्षी १४ जूनला राज्यभर कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात फुलांची, फळांची किंवा दीर्घकाळ टिकतील अशी मोठी झाडं लावावीत. छोटी रोपे बऱ्याचदा लक्ष न दिल्याने टिकत नाहीत, त्यामुळे नर्सरीतून मोठी झाडं आणून योग्य जागी स्थानिकांच्या हस्ते त्यांचे रोपण करावे. रस्ते रुंदीकरणात ही झाडे तुटणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी. तसेच, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन या झाडांची काळजी घेण्याच्या आणि त्यांना पाणी घालण्याच्या उपक्रमात त्यांनाही सामील करून घ्यावे.

हेही वाचा

महिला टी-२० वर्ल्डकपचा थरार उद्यापासून! जाणून घ्या टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल

हा उपक्रम केवळ एक दिवसाचा सोहळा नसावा, असा सज्जड दम भरताना त्यांनी पुढे म्हटले आहे की, फक्त फोटो काढून सोशल मीडियावर टाकून लाईक्स कमवण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नकोत, तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.

मुक्या प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणवठे उभारा

वृक्षारोपणासोबतच राज ठाकरे यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मांडला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी चंद्रपूरमध्ये जंगलातील प्राणी पाण्यासाठी शहरात वणवण भटकत असल्याचे दृश्य त्यांनी पाहिले होते. त्यावेळी त्यांनी तात्काळ तेथील मनसे सहकारी मनदिप रोडे याला फोन करून पाणवठे तयार करण्यास सांगितले आणि त्यांनी ते केले. याच धर्तीवर सर्व कार्यकर्त्यांनी जंगलांच्या तोंडाशी, तसेच शहरांमध्ये भटक्या प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणवठे उभारावेत आणि त्यात कायम पाणी असेल याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. हा उपक्रम राबवताना शासकीय यंत्रणेचीही मदत घेण्याचे त्यांनी सुचवले आहे.

…नाहीतर भविष्यात मुलांना झाडं दाखवायला न्यावं लागेल!

या उपक्रमामागचा गंभीर उद्देश स्पष्ट करताना राज ठाकरेंनी वाढत्या बेसुमार वृक्षतोडीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, यावर्षीचा उन्हाळा भीषण होता आणि हवामान तज्ज्ञांनुसार यंदा पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज आहे. याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात जाणवेल. सध्या राज्यात आणि देशात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. झाडांची जंगलं उद्ध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर जसे प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवावे लागतात, तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. म्हणूनच आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली आणि जगवली पाहिजेत, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button