मध्य प्रदेश: मतदानाच्या एक दिवस आधी भाजपा नेत्याच्या गाडीत सापडली रोकड
मध्य प्रदेशमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या गाडीतून रोकड जप्त करण्यात आली आहे. देवराजसिंह परिहार असे या नेत्याचे नाव असून त्यांच्या गाडीतून २.६० लाख रुपये जप्त करण्यात आले. घटनास्थळी देवराजसिंह उपस्थित होते. परंतु, तेथून पसार होण्यात ते यशस्वी झाले. या प्रकारानंतर काँग्रेसने पोलिसांवर भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत चक्का जाम आंदोलन केले. पोलिसांनी भाजपाच्या दबावाखाली परिहारला पळून जाण्याची संधी दिल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
पोलीस अधिकारी मानसिंह परमार यांनी सांगितले की, सांवेर विधानसभात मतदारसंघातील हतुनिया फाट्यावर परिहार यांच्या गाडीची तपासणी करताना त्यात २.६० लाख रुपये मिळाले. या वाहनात निवडणूक प्रचाराचे साहित्य होते. परमार यांच्या मते, घटनास्थळी जेव्हा पोलीस तपासणी करत होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिहार यांच्या वाहनाला घेराव घातला आणि आंदोलन करत रास्ता रोको केला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
गर्दीचा फायदा घेत परिहार आणि त्याच्या चालकाने तेथून पळ काढला. निवडणूक आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन अंतर्गत आरोपींवर भारतीय दंडविधान कलम १८८ आणि इतर कलमांअंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे. परिहार यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत. रास्ता रोको केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.