‘कॉक्रोच जनता पार्टी’चे जंतर-मंतरवर भव्य आंदोलन; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह ‘या’ आहेत ५ प्रमुख मागण्या

नवी दिल्ली | देशातील विविध शैक्षणिक आणि भरती परीक्षांमधील वाढते गैरव्यवहार तसेच पेपर फुटीच्या मुद्द्यावरून तरुण वर्ग कमालीचा आक्रमक झाला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके आज सकाळी अमेरिकेतून भारतात परतले असून, त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित भव्य शांततापूर्ण आंदोलनाचे थेट नेतृत्व केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे जंतर-मंतर परिसरात दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
आंदोलनाला संबोधित करताना अभिजित दिपके यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, “आपला हा लढा मोठा आहे. आम्ही गेल्या एका महिन्यापासून सोशल मीडियावर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मात्र, त्यावर कारवाई करण्याऐवी आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करणे आणि पोस्ट डिलीट करण्याचे काम केले जात आहे. तुम्ही आमच्या पोस्ट डिलीट करू शकता, पण आम्हाला इथून हटवू शकत नाही.” या आंदोलनादरम्यान दिपके यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र पाहायला मिळाले.

आंदोलनकर्त्यांच्या ५ प्रमुख मागण्या
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा तातडीने राजीनामा: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम’मधील कथित अनियमिततेची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
डिजिटल शिक्षणापूर्वी शिक्षकांचे योग्य प्रशिक्षण: शिक्षण क्षेत्रात कोणतीही डिजिटल तंत्रज्ञान प्रणाली घाईघाईने लागू करण्यापूर्वी शिक्षकांना त्याचे योग्य प्रशिक्षण दिले जावे आणि डिजिटल प्रणालीमुळे होणारे गैरप्रकार आधी रोखले जावेत.
हेही वाचा
टी-२० संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यर! १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात एन्ट्री
मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था पूर्ववत करणे: गेल्या तीन वर्षांपासून मणिपूरमधील विस्कळीत झालेली शाळा आणि महाविद्यालयांची व्यवस्था तातडीने सुरळीत करून तेथील विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करावा.
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता: लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षांची तयारी करतात, मात्र पेपर फुटीमुळे त्यांच्या कष्टावर पाणी फेरले जाते. त्यामुळे परीक्षा यंत्रणेत संपूर्ण पारदर्शकता आणली जावी.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी: परीक्षांमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थी प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत. या सर्व परिस्थितीला प्रशासनाने स्वतःला जबाबदार धरून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

चेहऱ्यावर ‘कॉक्रोच मास्क’ लावून अनोखे आंदोलन
या आंदोलनात शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक आणि तरुण व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक आंदोलकांनी चेहऱ्यावर कॉक्रोचचे (झुरळाचे) मास्क लावले होते आणि हातात फुले घेतली होती. आंदोलनस्थळी तरुणांनी “धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या!” आणि “जय भीम” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चळवळ आता थेट रस्त्यावर उतरल्याने केंद्र सरकारवरील राजकीय दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





