भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या..

IND vs AFG | भारतीय क्रिकेट संघ उद्या, ६ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याने यंदाच्या कसोटी हंगामाची सुरुवात करणार आहे. हा सामना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) भाग नसला, तरी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आले आहे, तर अफगाणिस्तान संघाची धुरा हशमतुल्ला शाहिदी सांभाळणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तब्बल आठ वर्षांनंतर कसोटी सामना खेळवला जात आहे. यापूर्वी २०१८ मध्ये बंगळुरू येथे या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना झाला होता. त्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने एक डाव आणि २६२ धावांनी मोठा विजय मिळवला होता. मात्र, गेल्या आठ वर्षांत अफगाणिस्तान संघाने क्रिकेट जगतात कमालीची प्रगती केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केल्यामुळे भारतीय संघ त्यांना हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. या कसोटी सामन्यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.
युवा खेळाडूंना सुवर्णसंधी
या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आयपीएल २०२६ आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय, फिरकीपटू मानव सुथारला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि फिरकी गोलंदाज हर्ष दुबे हे देखील या सामन्यात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहेत.
हेही वाचा
के. अन्नामलाई यांचा भाजपाला रामराम! तामिळनाडूत नवा प्रादेशिक पक्ष काढणार
सामना कधी, कुठे आणि किती वाजता?
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजजा सुरू होईल तर ९ वाजता नाणेफेक होईल. हा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर जिओ हॉटस्टार अॅपवर या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल.
भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
अफगाणिस्तान संघ:
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अब्दुल मलिक, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, रहमानउल्ला गुरबाज, रहमानउल्ला झादरन, अफसर झझाई (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अशरफ, नांग्याल खरोताई, कैस अहमद, बिलाल सामी, खलील अहमद, झहीर खान, निजात मसूद, यमीन अहमदझाई.





