संविधान दिनानिमित्त PCMC मध्ये व्यापक जनजागृती उपक्रम राबवा!
महापालिका मुख्यालयासह सर्व शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रम आयोजित करण्याची नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या घटनात्मक तत्त्वांचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले असून, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढाकार घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २४ नोव्हेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत डॉ. कांबळे यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष संविधान दिनाच्या आयोजनाकडे वेधले आहे. संविधान दिन केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता, तो लोकसहभागातून आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना दुचाकी टॅक्सींवर कारवाईचे आश्वासन
या निमित्ताने महापालिका मुख्यालयासह सर्व क्षेत्रीय कार्यालये, शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आयोजित करावे. तसेच संविधान जनजागृती कार्यक्रम, संविधान दौड, जलसा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, परिसंवाद आणि विविध शैक्षणिक उपक्रम राबवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून आवश्यक निधीची तरतूद करावी आणि सर्व संबंधित विभागांना नियोजनबद्ध आयोजनाच्या सूचना द्याव्यात, असेही डॉ. कांबळे यांनी नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून नियोजनाची मागणी
संविधान दिनाच्या कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही डॉ. सुहास कांबळे यांनी केली आहे. या बैठकीला महापौर, पक्षनेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संविधान हे केवळ देशाच्या शासनव्यवस्थेचा दस्तऐवज नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानातील मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा-महाविद्यालयांपासून समाजातील सर्व घटकांपर्यंत संविधानविषयक जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने संविधान दिन व्यापक लोकसहभागातून साजरा करावा, अशी मागणी आम्ही आमचे नेते आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.




