मे महिना संपला, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये कधी येणार?

Ladki Bahin Yojana | जून महिना सुरू होऊन चार दिवस उलटले तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम असल्याने राज्यातील लाखो महिलांची उत्सुकता वाढली आहे. दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
८० लाख महिला अपात्र; १ कोटी ६६ लाख लाभार्थी पात्र
यावेळी हप्ता वितरणात झालेल्या विलंबामागे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आणि लाभार्थ्यांची करण्यात आलेली कडक पडताळणी हे मुख्य कारण मानले जात आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी अनिवार्य केली होती.
या पडताळणी प्रक्रियेनंतर योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. नवीन आकडेवारीनुसार, ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या आता सुमारे १ कोटी ६६ लाख इतकीच राहिली आहे. तर उत्पन्न निकष, कागदपत्रांमधील त्रुटी, दुहेरी नोंदणी, इतर शासकीय योजनांचा लाभ किंवा अपूर्ण माहिती यांमुळे तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र लाभार्थी वगळल्यामुळे योजनेचा खर्च कमी होणार असून पात्र महिलांना वेळेत लाभ देणे शासनाला सोपे जाणार आहे.
हेही वाचा
रहाटणी, गंगानगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा ‘बुलडोझर’
१० ते १५ जून दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यातील १० ते १५ तारखेच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच महिला व बालविकास विभागाकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
यापूर्वी एप्रिल महिन्यात शासनाने मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले होते, ज्यामुळे महिलांच्या खात्यात थेट ३ हजार रुपये जमा झाले होते.
वंचित बहिणींना पुन्हा संधी मिळण्याचे संकेत
ई-केवायसी न केल्यामुळे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे अपात्र किंवा वंचित राहिलेल्या हजारो महिलांना पुन्हा या योजनेत सहभागी होण्याची आशा निर्माण झाली आहे.





