Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

To The Point : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता फक्त पार्थ पवार हेच ‘‘डिसिझन मेकर’’

उद्योजक मित्र विक्रम काकडे यांना विधान परिषद उमेदवारी ते पिंपरी-चिंचवडमध्ये आता संघटनात्मक खांदेपालट?

पुणे । विशेष प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता खासदार पार्थ पवार हेच ‘डिसिझन मेकर’ आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुरूवातील मुंबईतील झिशान सिद्धकी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उद्योजक विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही नियुक्तींमध्ये पार्थ यांचा ‘निर्णय अंतिम’ ठरला आहे.

२०१७ मध्ये पुणे महापालिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता उलथून लावण्यासाठी भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी रान पेटवले होते. त्याच संजय काकडे यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यात आला. त्यांच्या मुलाला विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महायुतीची विधान परिषद उमेदवारी देण्यात आली.

वास्तविक, विक्रम काकडे आणि पार्थ यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे पार्थ यांनी उमेदवारीबाबत त्यांना ‘शब्द’ दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले आहे. किंबहुना, पक्षात आता पार्थ पवार ‘डिसिझन मेकर’ आहेत, असा ‘स्ट्राँग’ मॅसेज देण्यात आला आहे.

… अशी आहे पार्थ पवार यांची रणनिती!

विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पार्थ पवार यांना स्वतःची विश्वासू आणि सक्षम टीम तयार करण्याची मोठी संधी आहे. पुढील तीन वर्षांनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुभवी नेत्यांसोबतच नव्या दमाचे, तरुण आणि विश्वासू चेहरे पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक पार्थ पवारांसाठी दीर्घकालीन राजकीय रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे. महायुतीमध्ये सहभागी असताना आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्या लागल्या, तर अल्पसंख्याक मतदारांना जोडणारा प्रभावी चेहरा म्हणून झिशान सिद्दकी यांना संधी देण्यात आली. तसेच, २०१७ मध्ये पुण्यात उद्योजक संजय काकडे यांनी राष्ट्रवादीला सुरूंग लावला होता. त्यांनाच पुन्हा हाताशी धरुन राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी पार्थ यांनी आपला मित्र आणि संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना मैदानात उतरवले आहे.

काकडे यांच्या नावाला CM फडणवीस यांची NOC

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने खासदार पार्थ पवार यांनी महायुतीमध्ये एकूण १७ पैकी दोन जागा मिळवण्यात यश मिळवले. रायगड आणि पुणे या दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी दिल्लीमध्ये भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केलेली बोलणी यशस्वी केली. सोबत, ज्येष्ठ नेते व उद्योजक संजय काकडे यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री CM देवेंद्र फडणवीस यांची NOC मिळाली. त्यामुळे पार्थ पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. काकडेंना उमेदवारी देवून महायुतीतील संभाव्य दगाफटका दूर केला आणि पक्षाच्या उभारणीसाठी नव्या चेहऱ्याला सोबत घेतले. यासह आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यात पक्षाला ताकद देणारा नेता हाताशी धरला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच खांदेपालट..!

विधान परिषद निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर तथा शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक संदीप वाघेरे तीव्र इच्छुक होते. मात्र, पार्थ पवार यांनी नवा चेहरा समोर आणला. विशेष म्हणजे, लवकरच पिंपरी-चिंचवडमध्ये संघटनात्मक खांदेपालट करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यमान शहराध्यक्ष योगेश बहल यांना शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदी आक्रमक आणि अभ्यासू नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची धुरा कुणाकडे मिळणार? याकडे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button