घरे खरेदी करणे आणखी महागले! मुंबईत घरांच्या किमतीत २० टक्के तर पुण्यात ११ टक्क्यांची वाढ

पुणे | देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतीत सातत्याने वाढ सुरू असून, आता सरासरी किमतीने पहिल्यांदाच प्रतिचौरस फूट १० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची संस्था ‘प्रॉपटायगर’ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत घरांच्या किमतीत २० टक्के, तर पुणे शहरात ११.९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. मात्र, किमती गगनाला भिडत असताना घरांची विक्री आणि नवीन घरांच्या पुरवठ्यात घसरण झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
अहवालानुसार, देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या सरासरी किमती प्रतिचौरस फूट १० हजार ५० रुपयांवर पोहोचल्या आहेत. मुंबईत घरांच्या सरासरी किमती सर्वाधिक असून, त्या १५ हजार १२० रुपये प्रतिचौरस फूट आहेत. त्या खालोखाल बंगळुरू (९ हजार ७८५ रुपये), दिल्ली (९ हजार ५३४ रुपये), हैदराबाद (८ हजार २४० रुपये), पुणे (७ हजार ९५७ रुपये), कोलकता (६ हजार २२२ रुपये) आणि अहमदाबाद (४ हजार ९४९ रुपये) असा क्रम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत घरांच्या सरासरी किमतीत सर्वाधिक २४ टक्के वाढ बंगळुरूत झाली असून, त्या खालोखाल मुंबईत २० टक्के, दिल्ली १७.६ टक्के, पुणे ११.९ टक्के, हैदराबाद ११.२ टक्के, अहमदाबाद ८.३ टक्के, कोलकता ६.६ टक्के आणि चेन्नईत ३.४ टक्के अशी वाढ आहे.
यंदा पहिल्या तिमाहीत प्रमुख महानगरांत ९५ हजार ९७३ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत ही विक्री ९८ हजार ९५ होती. त्या तुलनेत यंदा विक्रीत २.२ टक्के घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत मुंबईत सर्वाधिक २६ हजार ११६ घरांची विक्री झाली. त्या खालोखाल बंगळुरू १५ हजार ६०३, पुणे १३ हजार ५६५, हैदराबाद १३ हजार २९७, दिल्ली ९ हजार ४४७, अहमदाबाद ८ हजार २२१, चेन्नई ६ हजार ८४१ आणि कोलकतामध्ये २ हजार ८८३ घरांची विक्री झाली. यंदा पहिल्या तिमाहीत प्रमुख महानगरांतील नवीन घरांचा पुरवठा ९३ हजार ६५ आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ९३ हजार १४४ होता. त्यात आता ०.१ टक्का घट नोंदविण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा
IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ! एकाच हंगामात ५ मोठे पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू
मुंबई आणि पुण्यात घरविक्री मंदावली
मुंबईत घरांच्या विक्रीत १४.९ टक्के, तर नवीन घरांच्या पुरवठ्यात १३.२ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. पुण्यात तर घरांच्या विक्रीत तब्बल २१.३ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे, मात्र पुण्यात नवीन घरांच्या पुरवठ्यात १.५ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.
देशातील एकूण घरविक्रीत मुंबई अव्वल
घरांच्या विक्रीत घट झाली असली, तरी देशातील एकूण घरविक्रीमध्ये मुंबई आणि पुण्याचा वाटा मोठा आहे. पहिल्या तिमाहीत मुंबईत सर्वाधिक २६ हजार ११६ तर पुण्यात १३ हजार ५६५ घरांची विक्री झाली. देशातील एकूण विक्रीत शहरांचा वाटा खालीलप्रमाणे आहे:
- मुंबई – २७.२%
- बंगळुरू – १६.३%
- पुणे – १४.१%
- हैदराबाद – ११.२%
- दिल्ली – ९.९%
- अहमदाबाद – ८.६%
- चेन्नई – ७.१%
- कोलकता – ३.०%





