ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी चिखलीतील समस्यामुळे हाउसिंग सोसायटी संघटना आक्रमक

५ जूनपर्यंत तोडगा नाही तर ६ जूनपासून आमरण उपोषण..!

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

मोशी–चिखली परिसरातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या रस्ते विकास कामांबाबत पिंपरी-चिंचवड-चाकण हाउसिंग सोसायटी संघटन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाला ५ जूनपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत ठोस कार्यवाही व लेखी आश्वासन न मिळाल्यास ६ जूनपासून शांततापूर्ण आंदोलनासह आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही संघटनने दिला आहे.

मोशी–चिखली परिसरातील अनेक हाउसिंग सोसायट्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अत्यल्प पाणी दाब, अनियमित पुरवठा तसेच दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत असून, त्यामुळे घरगुती खर्चात लक्षणीय वाढ होत आहे.

हेही वाचा

पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सखोल चौकशीचे आदेश

संघटनच्या वतीने प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच ऐश्वर्यम अ‍ॅप्रोच रोड तसेच होरायझन ते रामा/स्वराज कनेक्टिंग रोड या महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना अद्याप सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी व कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मोशी–चिखली परिसरासाठी कायमस्वरूपी पाणी साठवण प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही संघटनने प्रशासनास सादर केला असून, हा विषय कोणताही राजकीय नसून केवळ मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित असल्याचे संघटनने स्पष्ट केले आहे.

“नागरिक केवळ मूलभूत सुविधा म्हणून योग्य पाणीपुरवठा आणि रस्ते विकासाची मागणी करत आहेत. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये. दरम्यान, ५ जूनपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास ६ जूनपासून सुरू होणारे आंदोलन व आमरण उपोषण प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.”

– सत्यब्रत त्रिपाठी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button