Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरले! विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. विषारी स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने गेल्या ४८ तासांत तब्बल १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण विविध रुग्णालयांत मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आणि सराईत दारू विक्रेता योगेश वानखेडे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात गुरुवारी एकाच दिवशी ८ जणांचा मृत्यू झाला होता, तर गेल्या ४८ तासांत फुगेवाडीतील आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, पुण्यातही या विषारी दारूने थैमान घातले असून, पुण्यातील काळे पडळ भागात ३ आणि हडपसर भागात २ अशा ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दारू प्यायलेल्या नागरिकांच्या तोंडाला फेस आला आणि त्यांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या काही जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सराईत गुन्हेगार योगेश वानखेडेने बनवली होती दारू

पोलीस तपासात समोर आले आहे की, ही विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे याने तयार केली होती. योगेश हा सराईत दारू विक्रेता असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने बनवलेली ही जीवघेणी दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांत मोठ्या प्रमाणावर विकली गेली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा

मोदी सरकारचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’! १५ जूननंतर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार?

मृतांची नावे खालीलप्रमाणे:

या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या काही नागरिकांची नावे समोर आली आहेत:
१) पांडुरंग फुगे
२) विजय प्रकाश राठोड
३) राजेंद्र प्रकाश राठोड
४) राजू राजपूत
५) अकबर पठाण
६) बाबा शेख
७) आनंद देसाई
८) आनंद निकाळजे
९) अक्षय अवसरमल
१०) सौरभप्पा भंगारी
११) भीमाप्पा बसवंत पुजारी

(पुण्यातील उर्वरित दोन मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत).

पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप, राजकीय वातावरण तापले

बंदी असलेल्या हातभट्टीची गावठी आणि विषारी दारू राजरोसपणे विकली जात असल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीमुळे आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. शहरातील अशा अवैध आणि जीवघेण्या धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर सहकाऱ्यांचा आणि दारू पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button