विराटला साथ द्या!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Untitled-8-31.jpg)
माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टचा भारतीय फलंदाजांना सल्ला
ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर भारताला कसोटी मालिका जिंकायची असल्यास संघातील इतर फलंदाजांनी कर्णधार विराट कोहलीला साथ देणे अत्यंत आवश्यक आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने सोमवारी व्यक्त केली. २०१४-१५च्या कसोटी मालिकेत कोहलीने चार शतके झळकावली होती, मात्र इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला मालिका २-० अशी गमवावी लागली होती.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला ६ डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरुवात होत असून कोहलीसाठी हे मैदान फारच लाभदायक ठरले आहे. २०१४ मध्ये येथे झालेल्या कसोटी सामन्यात कोहलीने दोन्ही डावांत शतक झळकावले होते.
‘‘ट्वेन्टी-२० मालिका आता संपली असून सर्वाचे लक्ष आता कसोटी मालिकेकडे लागले आहे. माझ्या मते कोहली २०१४ प्रमाणेच या मालिकेतसुद्धा त्याची छाप पाडण्यात यशस्वी होईल. काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी माझा संवाद झाला. त्या वेळी त्याचा उंचावलेला आत्मविश्वास व सिडनीतील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याने साकारलेली खेळी पाहता त्याला रोखणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी कठीणच जाईल,’’ अशा शब्दांत गिलख्रिस्टने कोहलीवर स्तुतीसुमने उधळली.
गिलख्रिस्टच्या मते, भारताला मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी इतर फलंदाजांनी कोहलीसह खेळपट्टीवर ठाण मांडणे गरजेचे आहे. यावरच भारताचे मालिकेतील यश अवलंबून आहे. कोहलीला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ वेगळी रणनीती आखत आहे का, याविषयी विचारल्यावर गिलख्रिस्ट म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियन गोलंदाज कोहलीसाठी काय व्यूहरचना आखत असतील, याविषयी मी काहीही सांगू शकत नाही. पण नव्या चेंडूवर भारताच्या सलामीवीरांना लवकरात लवकर बाद केल्यास कोहलीची चाचपणी होऊ शकते. त्यामुळे कोहलीला नव्या चेंडूसमोर खेळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मेहनत घेतली पाहिजे.’’