कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? सिद्धरामय्या-शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण

बेंगळुरू | कर्नाटकातील काँग्रेस सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच राज्यात पुन्हा एकदा नेतृत्वबदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतल्याने या चर्चा अधिक तीव्र झाल्या होत्या. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य बी. के. हरिप्रसाद यांनी कर्नाटकात नेतृत्वबदलाची कोणतीही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. या सर्व चर्चांमागे भाजपच्या ट्रोल आर्मीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वृत्तसंस्था ‘एएनआय’ (ANI) शी बोलताना बी. के. हरिप्रसाद म्हणाले की, सिद्धरामय्या यांची निवड ही पूर्ण पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचार किंवा इतर कोणतेही गंभीर आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत नेतृत्वबदलाचा कोणताही विचार केला जाणार नाही.
भाजपच्या ‘ट्रोल फॅक्टरी’वर गंभीर आरोप
बी. के. हरिप्रसाद यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, भाजपची सोशल मीडियावरील ट्रोल आर्मी ही केवळ खोट्या बातम्या पसरवणारी फॅक्टरी आहे. कर्नाटक सरकारला नाहक त्रास देण्यासाठी ते २४ तास कार्यरत आहेत. काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने नेतृत्वबदलावर भाष्य केलेले नाही, हे केवळ भाजपकडूनच पसरवले जात आहे. भाजपने स्वतःच्या अंतर्गत गोष्टींवर लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा
अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा
कर्नाटकात २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर, मुख्यमंत्रीपद ‘अडीच-अडीच वर्षे’ वाटून देण्याचा अनौपचारिक फॉर्म्युला ठरल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. यामुळेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे समर्थक आता त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी आक्रमकपणे करत आहेत.
मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी “मी पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार” अशी ठाम भूमिका घेतली आहे. दिल्लीतील हायकमांडसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना हरिप्रसाद यांनी स्पष्ट केले की, दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पुन्हा कसे पराभूत करायचे, याची रणनीती आखण्यासाठीच दिल्लीत बैठक बोळवण्यात आली होती. कर्नाटकमध्ये काँग्रेस पूर्णपणे मजबूत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





