राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी पावसाचा प्रभाव; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ कुठे ?

मुंबई : राज्यात एकीकडे विदर्भात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती नोंदली जात असतानाच उर्वरित राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळत आहे. वादळी पावसामुळे अनेक भागातील कमाल तापमानातही मागील काही दिवसांपाच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. पुढील सात दिवसांत विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित भागात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशातील उत्तरेच्या काही राज्यांसह महाराष्ट्रातील विदर्भातही उष्णेतची लाटेसदृश्य स्थिती कायम असून या प्रदेशातील अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती आणि गडचिरोली येथील कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस देशातील काही भागात उष्णेतची लाटेसदृश्य स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे विदर्भवासियांना पुढील काही दिवस तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, राज्यातील मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी हवामान असून बहुतांश भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. यामुळे या प्रदेशातील कमाल तापमानात घट झाली असून नागरीकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस या प्रदेशात वादळी पावसाचा प्रभाव राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळी पावसाची स्थिती लक्षात घेऊन हवामान विभगाकडून शुक्रवार आणि शनिवारसाठी या प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना शुक्रवारी हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळीवाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर आदी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून शनिवारसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर रायगड, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड आणि नाशिक घाट विभाग आदी भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.





