विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप, AI चा वापर अन् इंधन साठेबाजीवर कडक कारवाई; वाचा मुख्यमंत्री काय म्हणाले…

Devendra Fadnavis : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन हेच आमचे मिशन आहे आणि तेच आम्ही महाराष्ट्रात राबवत आहोत. सध्या आपण जगात अशा एका टोकावर उभे आहोत की जिथे ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे २०४७ पर्यंत भारत आणि महाराष्ट्राला विकसित बनेल,” असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘इमॅजिनेक्स्ट 2026 : इंडियाज् फेस्टिव्हल ऑफ टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्नब गोस्वामी यांच्यासमवेत ‘द महाराष्ट्र डिकेड : बिल्डिंग इंडियाज् ट्रिलियन डॉलर एआय फ्यूचर!’ या विषयावरिल कार्यक्रमात आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
‘ImagiNxt 2026 या मुंबई येथील विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या महत्त्वावर प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले, “AI च्या संदर्भात महाराष्ट्र काय काम करतोय, हे मी या ठिकाणी मांडले आहे. आज जी AI ची लाट आली आहे, ती कोणीही थांबवू शकत नाही. आपल्याला या लाटेवर आरूढ व्हावेच लागेल. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपली सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची लढाई अधिक गतिमान करू शकतो.” पंतप्रधानांच्या ‘इंडिया AI मिशन’च्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकार पावले टाकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. “महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, पेट्रोल आणि विशेषतः डिझेलची साठेबाजी कोणालाही करू देऊ नका. इंधनाचे योग्य नियोजन करा आणि आवश्यकतेनुसार प्रत्येकाला डिझेल मिळालेच पाहिजे, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
“राज्यातील काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे खरे असले तरी सगळीकडे अशी परिस्थिती नाही. एखादी घटना घडली की ती लगेच हायलाईट केली जाते. मात्र, अशी एखादी घटनाही घडू नये, यासाठी आमचे सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे,” असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. सध्या महाराष्ट्रात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे.





