आमच्या आईला मारलं, तर आम्ही का बोलू नये? प्रसाद लाड यांच्यासमोर मनोज जरांगेंचा सरकारवर तीव्र संताप

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असून ३० मे पासून नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे यांना उपोषण न करण्याचे आवाहन केले. मात्र, या भेटीदरम्यान मागच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जची आठवण काढत मनोज जरांगे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत सरकारवर निशाणा साधला.
आमदार प्रसाद लाड यांच्याशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत मराठा महिलांवर झालेल्या लाठीचार्जवरून सरकारला खडेबोल सुनावले. मागील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या भाषेवर बोलताना जरांगे म्हणाले, “तुमची आई खरंच आमची आई आहे, इतकी संस्कृती सोडलेले आम्ही लोक नाही आहोत. पण ज्या दिवशी तुम्ही आमच्या आईला माराल, मग आम्ही तुमच्या आईवर का बोलू नये? त्या दिवशी आमच्या माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या, तेव्हा आम्ही गप्प का बसावं? त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हता. मी तर उपोषणात होतो; उपोषणात कसेही शब्द जातील. उपोषणाच्या बाहेर असे शब्द वापरले असतील तर दाखवा. उपोषण ही अशी विचित्र चीज आहे की माणसाला काहीच सुचत नाही, इतकी भयंकर स्थिती असते.”
हेही वाचा
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा
त्यावेळच्या भीषण परिस्थितीचे वर्णन करताना जरांगे पुढे म्हणाले, “त्या महिलांना इतके मारले गेले, साधे पाणी तरी पाजायचे ना! पोलिसांना पण आई असेलच ना? राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या पोलिसांनी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्ताने आमच्या माता-भगिनींना मारले होते. तुम्ही हे सहन करून दाखवाल का? तिला मारले, गोळ्या घातल्या, कुणाचे नाक तुटले तर कुणाचे कान तुटले.”
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर उपस्थित केला सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात माझे पोलीस आहेत, माझ्या पोलिसांना मारले. मग ही जनता तुमची नाही का? तुमचे लोक फक्त पोलीसच आहेत का? जर आत्ता तुम्हाला फोन आला की तुमच्या घरातील कोणाला मारले, तर तुम्ही अंतरवलीत शांत बसून राहाल का? मुख्यमंत्री म्हणतात माझ्या पोलिसांना हाणले, तेव्हापासूनच त्यांच्याविषयीचे आमचे मन बदलले आहे आणि म्हणूनच ते संतप्त शब्द बाहेर पडले.”





