महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचं बिगूल वाजलं! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी अखेर द्वैवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये ६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, येत्या १८ जून रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या ज्या १६ आमदारांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचा
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक:
- अधिकृत अधिसूचना जारी होणार: २५ मे २०२६ (सोमवार)
- उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ०१ जून २०२६ (सोमवार)
- उमेदवारी अर्जांची छाननी: ०२ जून २०२६ (मंगळवार)
- अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस: ०४ जून २०२६ (गुरूवार)
- मतदान: १८ जून २०२६ (गुरूवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)
- मतमोजणी आणि निकाल: २२ जून २०२६ (सोमवार)
निवडणुकीचा पेच कसा सुटला?
नियम आणि अटींनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार निवडून आणण्यासाठी तिथल्या किमान ७५% लोकल बॉडीज (स्थानिक संस्था) भरलेल्या असणे कायदेशीररीत्या आवश्यक असते. महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या आणि विधान परिषदेची ही निवडणूक रखडली होती.
परंतु, आता राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेची अट पूर्ण झाल्यानंतर याविषयीची आवश्यक ती माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवली. ही तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या १६ जागांसाठी अधिकृतपणे बिगुल फुंकले आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा चांगलेच तापणार आहे.





