ताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्ह्यात टँकर पाणीपुरवठ्यासाठी OTP आधारित सॉफ्टवेअर प्रणाली लागू करण्याचे निर्देश

टँकर पाणीपुरवठ्यात पारदर्शकता वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा डिजिटल प्रणालीवर भर

पुणे : पुणे जिल्ह्यात टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नियंत्रित करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओटीपी (OTP) आधारित सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी शाखेकडून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC), पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता झालेल्या बैठकीत या नव्या प्रणालीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले होते. बैठकीस विविध संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा व्यवस्थापनात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांना वेळेत व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे हा या प्रणालीमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –  RCB vs KKR : कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज, आरसीबीचा गेम करणार?

या OTP आधारित सॉफ्टवेअर प्रणालीमुळे टँकरचे GPS ट्रॅकिंग करता येणार असून टँकर कुठून निघाला, कुठे पोहोचला, किती वेळात पोहोचला याचे रिअल-टाईम मॉनिटरिंग शक्य होणार आहे. तसेच टँकर चालकांची शारीरिक तपासणी, अल्कोहोल टेस्ट आदी बाबींची नोंद ठेवता येणार असल्याने संपूर्ण यंत्रणा अधिक जबाबदार आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

याशिवाय, टँकर प्रत्यक्षात नियोजित ठिकाणी पोहोचला की नाही, पाणीपुरवठा पूर्ण झाला की नाही याची OTP द्वारे खातरजमा करता येणार असल्याने गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या मते, या प्रणालीमुळे पाणीटंचाईच्या काळात टँकर व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकर्समध्ये ही प्रणाली तातडीने लागू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पुणे जिल्ह्यात टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे ही काळाची गरज आहे. ओटीपी आधारित सॉफ्टवेअर प्रणालीमुळे प्रत्येक टँकरचा प्रवास, वितरण आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा यावर रिअल-टाईम नियंत्रण ठेवता येईल. यामुळे केवळ गैरप्रकारांना आळा बसणार नाही तर नागरिकांपर्यंत वेळेत आणि निश्चित प्रमाणात पाणी पोहोचेल याची खात्रीही मिळेल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही प्रणाली तातडीने आणि प्रभावीपणे राबवावी.

– जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button