Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आदिवासींच्या २४ शाळांची श्रेणीवाढ, सोलापूरला नवे अभियांत्रिकी महाविद्यालय; मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय!

मुंबई: राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत तर १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने आवश्यक अशा पदनिर्मितीस व त्याकरिता खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली. राज्यातील डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबणार आहे.

राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सन १९७२ पासून “आश्रमशाळा समूह” योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थाकडून ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यापैकी ३७ प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा (इयत्ता १ ली ते ७ वी) व ३१९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा (इयत्ता १ ली ते १० वी) आहेत. माध्यमिक आश्रमशाळा संलग्न २०० कनिष्ठ महाविद्यालये (इयत्ता १ ली ते १२ वी) सुरु आहेत. या शाळांमध्ये सुमारे २ लाख ६१ हजार ८३६ (१ लाख ४० हजार २५४ मुले आणि १ लाख २१ हजार ५८२ मुली) विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळा दुर्गम,अतिदुर्गम, डोंगराळ किंवा नक्षलग्रस्त अशा भागात आहेत. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी विद्यार्थी तालुका किंवा जिल्हयाच्या ठिकाणी जाऊन पुढील शिक्षण घेण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे गळतीच्या प्रमाणात वाढ होते. विद्यार्थी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येते. या गळती मध्ये मुलींची संख्या मोठी असते. यासाठी या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच निवासी शिक्षण उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानेही आदिवासी विकास विभागाला अनुदानित आश्रमशाळांना प्रोत्साहन देण्याची शिफारस केली आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील ‘या’ भागात झाला गारांचा पाऊस, राज्यात हवामानाचा ‘विचित्र’ खेळ

राज्यातील ५ प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करुन तिथे आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये १८ ठिकाणी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (इयत्ता ११ वी व १२ वी कला व विज्ञान शाखा) एका ठिकाणी केवळ ११ वी व १२ वी कला अशा १९ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), सोलापूर असे करण्यात आले.

सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थींच्या दृष्टीने महत्वांचे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी साठ अशी असेल. एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे हे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून पासून उपलब्ध असणार आहेत. यामुळे या परिसरातील सुमारे १८० विद्यार्थ्यांना या नव्या शैक्षणिक वर्षापासून सोलापूरमध्येच अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तुळजापूर येथील तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष (जिल्हाधिकारी) यांनी संस्थांनामार्फत चालविले जाणारे श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पाच सदस्यीय समितीने या महाविद्यालयाच्या हस्तांतरणाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सादर केला. त्यानुसार महाविद्यालयाची जागा, इमारत आणि साहित्यासह शासनाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री. तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर, या नावाने ओळखले जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button