विधानपरिषद निवडणुकीच्या अर्जाच्या “छाननीनंतर मोठा उलटफेर! ‘या’ 4 जणांचे अर्ज बाद

MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या निवडणुकीतील (MLC Election) उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी पार पडली.
या प्रक्रियेदरम्यान अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार होते. भाजपने पाच उमेदवारांसह पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती. तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने एक असे एकूण नऊ उमेदवार मैदानात उतरवले होते.
शनिवारी झालेल्या छाननीत अपक्ष उमेदवारांच्या अर्जांना वैधता मिळाली नाही. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या नऊ उमेदवारांपुढे कोणतीही स्पर्धा उरली नाही. परिणामी, त्यामुळे या उमेदवारांची आमदारकी पक्की झाली आहे.
हेही वाचा – जागतिक आर्थिक संकटात सोन्याची चमक वाढली, ‘गोल्ड रिझर्व्ह’च्या शर्यतीत भारत टॉप 10 मध्ये
‘या’ नेत्यांची आमदारकी पक्की
भाजप – प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर, प्रज्ञा सातव
शिवसेना (शिंदे) – निलम गोऱ्हे, बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेस – झिशान सिद्दीकी
शिवसेना (ठाकरे ) – अंबादास दानवे
निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून तिसरा उमेदवार देऊन चुरस निर्माण करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शिंदे गटाने तिसरा उमेदवार न देता इतर पक्षांशी समन्वय साधला.
तसेच काँग्रेस पक्ष प्रारंभी नाराज असला तरी ठाकरे गटातील नेत्यांनी काँग्रेस नेत्यांची समजूत घालून अंबादास दानवेंना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार काँग्रेसनेही दानवेंना पाठिंबा जाहीर केला.





