Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“महाबीजची नवी उत्पादने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग ठरतील”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

वाशिम  : “महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. नव्याने विकसित करण्यात आलेली निमास्त्र, महास्पीड, महाबीज कर्बमापक व आर.व्ही.एस.एम. २०११-३५ ही उत्पादने शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसोबतच खर्चात बचत करून शेती अधिक समृद्ध करण्यास हातभार लावतील.” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच सेंद्रिय, शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या विविध उत्पादनांचे लोकार्पण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाबीजच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त महाबीजने नाविन्यपूर्ण अशी चार नवी उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये सेंद्रिय कीडनियंत्रण, जलद कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण तसेच उच्च उत्पादनक्षम सोयाबीन वाणांचा समावेश आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबीजने प्रथमच अशा प्रकारची चार नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करून नवा इतिहास घडविला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाबीजला खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेत सक्षमपणे उभे केले आहे. उद्या, दि. २ मेपासून ही उत्पादने शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत.

महाबीजने सादर केलेल्या उत्पादनांमध्ये निमास्त्र या अतिसूक्ष्म निंबोळी पावडरचा समावेश असून हे उत्पादन पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त आहे. हे सेंद्रिय शेतीसाठी लाभदायक असून वापरण्यास सोपे आणि सर्वत्र माफक दरात उपलब्ध आहे. पर्यावरणपूरक नैसर्गिक संरक्षण म्हणूनही हे उत्पादन महत्त्वाचे मानले जात आहे.

हेही वाचा –  ‘जिद्दीच्या वारशातून लातूर जिल्ह्याचा विकास साधूया’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

तसेच महास्पीड हे जलद विघटक उत्पादन हिरव्या कचऱ्याचे दर्जेदार सेंद्रिय खतामध्ये जलद रूपांतर करते. यामुळे कचरा व्यवस्थापन सुलभ होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत होण्यासही हे उत्पादन उपयुक्त ठरणार आहे.

महाबीजने महाबीज कर्बमापक हे मातीतील सेंद्रिय कर्ब परीक्षण संचही बाजारात आणले आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावरच सहज, सुलभ आणि जलद पद्धतीने मातीतील कर्ब तपासणी करता येणार आहे. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नसून हे उत्पादन अत्यंत माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय महाबीजने ट्रायकोडर्मा विरेन्स या जैविक बुरशीनाशक व नेमॅटिसाइड उत्पादनाचीही निर्मिती केली असून हे उत्पादन पिकांच्या मुळांचे संरक्षण, रोग नियंत्रण आणि निरोगी वाढीसाठी उपयुक्त आहे.

निमास्त्र, महास्पीड व महाबीज कर्बमापक या उत्पादनांचे तंत्रज्ञान भाभा अनुसंधान केंद्र, मुंबई येथून प्राप्त करून या तीन उत्पादनांची निर्मिती करण्यात आली आहे.

सोयाबीन उत्पादकांसाठी महाबीजने आर.व्ही.एस.एम. २०११-३५ हे क्रांतिकारी सोयाबीन वाण सादर केले आहे. या वाणाची फुले पांढऱ्या रंगाची असून उत्पादन क्षमता प्रतिहेक्टर १० ते १२ क्विंटल आहे. याची कालावधी ९५ ते १०० दिवसांची असून यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी हे वाण उपयुक्त आहे. तसेच दाण्यांचा रंग आकर्षक असल्याने बाजारमूल्य चांगले मिळण्याची शक्यता आहे.

“महाबीजच्या या नव्या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, जमिनीची गुणवत्ता सुधारणा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असल्याचे” मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button