एसटीमध्ये आता ‘जय महाराष्ट्र’; ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान सुरू होणार

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील बसमध्ये महाराष्ट्राचा जयजयकार होणार आहे. एसटीचे वाहक आता प्रवाशांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणून त्यांचे स्वागत करतील. ‘आपली बस, आपली सेवा’ हे अभियान १ मे २०२६ पासून राज्यभरातील मध्यम व लांब पल्ल्याच्या बसमध्ये कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे प्रवाशांना अधिक दर्जेदार, स्वच्छ व सन्मानपूर्वक सेवा मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
‘आपली बस, आपली सेवा’ या अभियानांतर्गत चालक व वाहकांची जबाबदारी अधिक स्पष्ट केली आहे. बस सुरू करण्यापूर्वी स्वच्छतेची खात्री करण्यात येईल. एसटी सुटण्याच्या किमान १५ मिनिटे आधी फलाटावर बस उभी करण्यात येईल. तसेच चालक आणि वाहकाला गणवेशासह वेळेत हजर राहणे बंधनकारक केले आहे. बस सुटण्यापूर्वी वाहक प्रवाशांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणून स्वतःची व चालकाची ओळख करून देणार आहेत.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत असून एसटीच्या फेऱ्यांमध्येही वाढ होत आहे. मात्र प्रवासी संख्या वाढत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून उत्तम सेवा देणे, प्रवाशांचा अनुभव सुधारणा करणे आणि तक्रारींचे प्रमाण कमी करणे या प्रमुख बाबींवर भर देण्यात येणार आहे. याद्वारे प्रवासी संख्या वाढवून उत्पन्नातही वाढ करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रवासाचा मार्ग, थांबे, वेळापत्रक आणि उपलब्ध आसनांची माहिती देणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच आरक्षित प्रवासी वेळेत न आल्यास त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
प्रवासादरम्यान मदतीसाठी वाहकांशी संपर्क साधण्याचे आवाहन, मौल्यवान वस्तू स्वतःजवळ सुरक्षित ठेवण्याची सूचना, तसेच मोठे सामान डिक्कीत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी प्रवाशांचे सहकार्यही अपेक्षित आहे.
एनसीएमसी कार्डचा वापर वाढवण्यासाठी आणि ऑनलाइन आरक्षणासाठी एमएसआरटीसी बस रिझर्वेशन अॅप व अधिकृत संकेतस्थळाचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया; रिक्षा-टॅक्सी चालकांना म्हणाले…
बस रद्द झाल्यास प्रवाशांना तातडीने परतावा देणे, तसेच मार्गात बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था करून देणे बंधनकारक असेल. प्रवासी तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमून नियमित आढावा घेण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रवासी संख्या आणि महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर ठेवले आहे. राज्यातील प्रदेश व विभागीय कार्यालयांकडून या योजनेचा दैनंदिन आढावा घेतला जाणार असून, ५ मेपर्यंत परिपत्रकाची अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





