‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहिल्यानगर : श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या ३०० वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा व लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पाण्याचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य या यात्रेतून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडकुते, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, प्रवीण कोल्हे, देविदास महाराज, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंझुर्डे, दयानंद महाराज कोरगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून स्वराज्याचा विस्तार केला. सुशासन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन आणि राष्ट्रनिर्मिती ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. २९ वर्षांच्या आदर्श शासनातून लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धन, धर्मशाळांची उभारणी, मंदिरांचे जीर्णोद्धार, नद्यांवर घाटांची निर्मिती, आदर्श करव्यवस्था तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती देऊन समाजहिताचे कार्य केले. त्या काळात महिला सक्षमीकरणालाही त्यांनी चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने महिलांमध्ये आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्य शासनही लोककल्याण व विकासासाठी कटिबद्ध आहे. मागील चार वर्षांत सुमारे सव्वा चार लाख कोटी रुपयांच्या २२३ जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, यामुळे ३२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणीपुरवठा, नद्यांचे पुनरुज्जीवन, दुष्काळग्रस्त भागांकडे पाणी वळविणे तसेच धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.





