रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी सक्तीची! सरकार बनवणार खास अभ्यासक्रम

Marathi Language : महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचाच वापर करावा लागणार आहे. राज्य सरकारने १ मेपासून ही अट अनिवार्य केली असून, अमराठी चालकांसाठी खास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या, २३ एप्रिल रोजी एक विशेष बैठक घेणार आहेत. या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा भाषिक अस्मितेचे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीत भाषातज्ज्ञ, साहित्यिक आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होऊन चालकांसाठी एक सुटसुटीत आणि संवादात्मक अभ्यासक्रम निश्चित करतील. केवळ प्रशासकीय आदेश न राहता, चालकांमध्ये मराठीबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, असा सरकारचा मानस असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्येच असा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. अनेकदा अमराठी चालकांमुळे स्थानिक प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे आता राज्यातील सर्व ५९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांद्वारे विशेष मोहीम राबवून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये ओला, उबर आणि ई-बाईक सारख्या ॲप-आधारित सेवांचाही समावेश असेल.
दुसरीकडे, या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत आक्रमक पवित्रा घेत रिक्षांवर ‘मी मराठी बोलतो’, ‘मला मराठी समजते’ अशा आशयाचे स्टिकर्स लावण्यास सुरुवात केली आहे.
ज्या चालकांना मराठीचा अभिमान नाही, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यांनी मराठी भाषिक प्रवाशांना केवळ अशाच रिक्षांतून प्रवास करण्याचे आवाहनही केले आहे.
मात्र, सरकारच्या या निर्णयाला रिक्षा संघटनांकडून विरोध होताना दिसत आहे. काही संघटनांनी या सक्तीविरोधात ४ मेपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.





