किवळे परिसरातील कचरा वाहतूक केंद्र स्थलांतराचा प्रस्ताव
सर्वसाधारण सभेच्या निर्णयाकडे लक्ष : नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!

पिंपरी-चिंचवड | किवळे प्रभाग क्रमांक १६ मधील सर्व्हे नं. ६६, आरक्षण क्र. ४/१०३ येथे सध्या कार्यरत असलेल्या कचरा वाहतूक केंद्रामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. या संदर्भात भाजपाचे नगरसेवक कुणाल वाव्हळकर व नगसेवक उत्तमराव केंदळे यांनी प्रस्ताव सादर केला असून, शहर सुधारणा समितीच्या ठराव क्र. ४ दिनांक ०८/०४/२०२६ अन्वये यावर चर्चा झाली आहे.
सदर ठिकाणाच्या परिसरात सुमारे एक हजाराहून अधिक कुटुंबांची वस्ती आहे. याशिवाय देहूरोड येथील अॅम्युनेशन डेपो (दारुगोळा साठा केंद्र) जवळच असल्याने संभाव्य अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कचरा वाहतूक केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डेंग्यू, मलेरिया, श्वसनाचे विकार, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका सातत्याने वाढत असून, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : प्रकल्पग्रस्तांना दिलासा! परवडणाऱ्या दरात घरांचे स्वप्न साकारण्याच्या उंबरठ्यावर!
याशिवाय या केंद्रावर यापूर्वी अनेक वेळा आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अॅम्युनेशन डेपोच्या निकटतेमुळे अशा घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही, असे देहूरोड अॅम्युनेशन डेपो प्रशासनानेही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला दिलेल्या लेखी पत्रात स्पष्ट केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर कचरा वाहतूक केंद्राचे स्थलांतर सर्व्हे नं. ८, आरक्षण क्र. ४/१६२ (मैलाशुद्धीकरणासाठी आरक्षित जागा) येथे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच रिक्त होणाऱ्या आरक्षण क्र. ४/१०३ या जागेवर अग्निशमन केंद्र उभारणे किंवा नागरिकांसाठी क्रीडा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बॅडमिंटन हॉल उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तो महानगरपालिका सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
“किवळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कचरा वाहतूक केंद्रामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ठिकाणी स्थलांतराचा प्रस्ताव आम्ही पुढे नेला आहे. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा राहील.”
— कुणाल ओव्हाळकर, नगरसेवक, भाजपा.





