गौतम अदाणी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत; अंबानी दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई | अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला असून त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’नुसार, अदाणी यांची एकूण संपत्ती ९२.६ अब्ज डॉलर्स (सुमारे ७.७ लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.
यावर्षात अदाणी यांच्या संपत्तीत ८.१० अब्ज डॉलर्सची (सुमारे ६७ हजार कोटी रुपये) वाढ झाली असून जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांनी १९ वे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, मुकेश अंबानी यांची संपत्ती सध्या ९०.८ अब्ज डॉलर्स (सुमारे ७.५ लाख कोटी रुपये) इतकी असून ते आशियात दुसऱ्या आणि जागतिक स्तरावर २० व्या क्रमांकावर आहेत.
हेही वाचा : जातनिहाय जनगणना होणारच; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ग्वाही
अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी
गुरुवारी (१६ एप्रिल २०२६) भारतीय शेअर बाजारात किरकोळ घसरण झाली असली तरी अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. त्यामुळे अदाणी यांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे ३.५६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास स्थिर पातळीवर बंद झाले आणि अंबानी यांच्या संपत्तीत ७६.७ दशलक्ष डॉलर्सची वाढ नोंदवली गेली.
जगातील सर्वात श्रीमंत १० लोक
एलॉन मस्क यांनी ६५६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहेत. या वर्षी, त्यांच्या एकूण संपत्तीत ३६.७ अब्ज डॉलर्सची प्रचंड वाढ झाली आहे. गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज २८६ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ॲमेझॉनचे जेफ बेझोस (२६९ अब्ज डॉलर्स), सर्गेई ब्रिन (२६६ अब्ज डॉलर्स), मार्क झुकरबर्ग (२३९ अब्ज डॉलर्स), लॅरी एलिसन (२३० अब्ज डॉलर्स), मायकल डेल (१७० अब्ज डॉलर्स), जेन्सेन हुआंग (१६४ अब्ज डॉलर्स), बर्नार्ड अर्नोल्ट (१६४ अब्ज डॉलर्स) आणि जिम वॉल्टन (१५० अब्ज डॉलर्स) यांचाही या शीर्ष १० जणांच्या यादीत समावेश आहे.





