ललित मोदी यांनी स्वीकारले ब्रिटिश नागरिकत्व! लंडनच्या ‘ऑक्सफोर्ड युनियन’मधून केली अधिकृत घोषणा

Lalit Modi | इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) संस्थापक ललित मोदी यांनी अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याची घोषणा केली आहे. लंडनमधील प्रतिष्ठित ‘ऑक्सफोर्ड युनियन’ला संबोधित करताना तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. १५ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्याला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले असून, “ब्रिटिश नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि आता माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे,” असे ललित मोदी यांनी म्हटले आहे.
आयपीएलमधील आर्थिक अनियमितता, मनी लॉन्डरिंगसह विविध गंभीर आरोप आणि तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर ललित मोदी यांनी भारतातून पळ काढला होता. तेव्हापासून ते ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना भारतात परत कधी आणले जाणार, याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता त्यांनी अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी (१४ नोव्हेंबर) ऑक्सफोर्ड युनियनमध्ये बोलताना त्यांनी हा मोठा खुलासा केला.
हेही वाचा
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासकामांची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी
‘आता यूके हेच माझं घर असेल’ – ललित मोदी
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ललित मोदी यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “१४ नोव्हेंबर २०२६ रोजी मला ‘ऑक्सफोर्ड युनियन’मध्ये संबोधित करण्याचा मान मिळाला. तिथे मी माझ्या आयुष्यातील एक अत्यंत विशेष बाब सर्वांसमोर मांडली. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत मी माझ्या ब्रिटिश नागरिकत्वाचा आनंद साजरा केला.”
पुढे ब्रिटनबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी लिहिले की, “युनायटेड किंगडम हे अनेक वर्षांपासून माझं घर राहिलं आहे. येथील लोक, संस्था, परंपरा आणि मूल्यांविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. ब्रिटिश नागरिक होणं ही एक मोठी संधी आणि जबाबदारी आहे, जी मी अभिमानाने स्वीकारतो. ज्या देशाला मी अभिमानाने माझं ‘घर’ म्हणतो, त्या देशाच्या प्रगतीत यापुढेही सकारात्मक योगदान देण्यास मी उत्सुक आहे.” तसेच, राजा चार्ल्स तिसरे यांच्या वाढदिवशी ही बातमी शेअर करताना आनंद होत असल्याचे म्हणत त्यांनी “गॉड सेव्ह द किंग” असेही पोस्टच्या शेवटी नमूद केले आहे.




