सलग तीन पराभवांनी मुंबई इंडियन्स अडचणीत; प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार? वाचा समीकरण

Mumbai Indians | मुंबई इंडियन्स संघाने १३ वर्षांनंतर आयपीएलमधील सलामीचा सामना जिंकत मोहिमेला सुरुवात केली. मात्र पहिला सामना जिंकल्यानंतर पाच वेळचा चॅम्पियन ठरलेल्या या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. सलग तीन पराभवांनंतर आता मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचं गणित कसं असणार जाणून घेऊया…
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजयाने सुरुवात केली, पण त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सलग तीन सामने गमावले. त्यामुळे सध्या संघ अडचणीत सापडलेला दिसत आहे. तरीही स्पर्धेचा अर्ध्याहून अधिक टप्पा अजून बाकी असल्याने त्यांच्याकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी कायम आहे.
हेही वाचा : डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ ‘द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा’वर यशस्वी उपचार
प्लेऑफसाठी काय आहे गणित?
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही संघाला गुणतालिकेत टॉप-४ मध्ये स्थान मिळवणे आवश्यक असते. साधारणपणे प्लेऑफसाठी १६ गुणांची गरज असते, म्हणजेच किमान ८ सामने जिंकावे लागतात. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ४ पैकी १ सामना जिंकला असून अजून १० सामने बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित १० सामन्यांपैकी किमान ७ सामने जिंकणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. असे झाल्यासच ते १६ गुणांपर्यंत पोहोचून पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतात.
पुनरागमनाची आशा कायम
आयपीएल २०२५ मध्येही मुंबई इंडियन्सची सुरुवात अशीच खराब झाली होती. मात्र त्यानंतर संघाने सलग विजयांची मालिका रचत जोरदार पुनरागमन केले आणि १६ गुणांसह चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यामुळे यंदाही उशिरा का होईना, ते दमदार पुनरागमन करू शकतात, अशी आशा चाहत्यांना आहे.





