देशाची ऊर्जा साखळी मजबूत.! १५ हजार टन एलपीजी घेऊन जहाज मुंबईत दाखल

Gas Cylinder : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. दरम्यान गुरुवारी, ९ एप्रिल २०२६ ला १५,४०० टन एलपीजी घेऊन ग्रीन आशा हे भारतीय जहाज यशस्वीरित्या नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात दाखल झाले. या यशस्वी मोहिमेमुळे देशातील घरगुती गॅस पुरवठ्याला मोठी बळकटी मिळाली आहे.
पश्चिम आशियातील अत्यंत संवेदनशील समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी पार करून या जहाजाने हा प्रवास पूर्ण केला आहे. जेएनपीए प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ग्रीन आशा हे भारतीय ध्वज असलेले जहाज युद्धाच्या छायेतून वाट काढत सुरक्षितपणे भारतात पोहोचले.
हेही वाचा – ‘मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार’; मंत्री नितेश राणे
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग असून, युद्धाच्या काळात इथून होणारी वाहतूक अत्यंत धोक्याची मानली जाते. भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली आणि केंद्र सरकारच्या मुत्सद्दी धोरणांमुळे हे जहाज सुरक्षितपणे मायदेशी परतले आहे.
या जहाजावरील १५,४०० टन गॅसचा साठा, मालवाहू यंत्रणा आणि सर्व कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. पश्चिम आशियातील भू-राजकीय अस्थिरतेच्या काळातही भारताची ऊर्जा पुरवठा साखळी किती सक्षम आहे, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. जेएनपीए, ज्याला न्हावा शेवा बंदर म्हणूनही ओळखले जाते, हे देशातील कंटेनर आणि लिक्विड कार्गो हाताळणारे प्रमुख केंद्र आहे.





