Breaking News: यमुनानगर येथील जलतरण तलाव संचालनाचा वादग्रस्त विषय अखेर रद्द!
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे ‘‘सत्याचा सारथी’’ : शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांचा ‘डाव फसला’
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक १३ मधील माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे काम वादग्रस्त आणि सदोष ठेकेदाराला देण्याचा आग्रह करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे यांचा डाव फसला आहे. हा विषय स्थायी समितीने अखेर रद्द केला आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या प्रकरणात ‘‘सत्याचा सारथी’’ अशी भूमिका घेतली. त्याचे स्थायी सदस्यांकडून स्वागत केले जात आहे. विशेष म्हणजे, स्थायी समिती सदस्यांनी एकमताने हा विषय निकालात काढला आहे.
यमुनानगर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलाव गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा तलाव सुरू करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यासाठी महापालिका निवडणुकीपूर्वीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. स्थायी समितीची स्थापना झाल्यानंतर हा विषय मंजुरीसाठी अजेंड्यावर आला. मात्र, भाजपाच्या स्थानिक नगरसेविका अर्चना कारंडे यांनी या विषयाला विरोध केला, तर याच प्रभागातील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी विषय मंजूर करण्यासाठी आग्रह धरला होता.
दरम्यान, दि. १८ मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकपूर्व चर्चेत सुलभा उबाळे आणि अर्चना करांडे यांचे पति अक्षय करांडे यांच्यात मतभेद झाले होते. ‘‘स्थायी समितीचे सदस्य नसताना, तुम्ही बैठकीत कसे उपस्थित आहेत? असा प्रश्न उबाळेंनी उपस्थित केला होता. हा विषय प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आला. त्यानंतर उबाळे यांनी भाजपाचे स्थानिक नगरसेवक, शहराध्यक्ष आणि स्थायी समिती सभापतींना फोन करुन हा विषय मंजूर करण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले होते.
वास्तविक, या प्रकरणातील ए. के. ग्रुप ग्रिफीन्स या ठेकेदारवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याची कारवाई केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालयाने केली. या चौकशीमध्ये संबंधित ठेकेदाराने ९५ लाख रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. सदरप्रकरणी शासन स्तरावर चौकशी सुरू आहे, असे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला कळवले आहे. ही बाब स्थायी समिती सभापतींच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सदर ठेकेदाराची निविदा रद्द करावी असा प्रस्ताव अर्चना करांडे यांनी ठेवला. त्याला सारिका गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभापती अभिषेक बारणे यांनी न्याय्य भूमिका घेतली आहे.
दरम्यान, या प्रकरणात ‘‘महाईन्यूज’’ ने सडेतोड वृत्तांकन केले होते. महापालिका स्थायी समिती सभापती आणि सदस्यांनी चुकीच्या विषयांना खतपाणी घालू नये, अशी भूमिका मांडली होती. त्याला पदाधिकारी व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अक्षय कारंडे यांच्या संघर्षाला यश…
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी कै. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने महापालिका प्रशासनाने यमुनानगर येथे जलतरण तलाव सुरू केला आहे. मात्र, हा तलाव बंद अवस्थेत होता. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते अक्षय करांडे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पण, निविदा प्रक्रियेमध्ये सदोष काम करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत होते. विशेष म्हणजे, सदरचे काम ३० टक्के वाढीव दाराने देण्याचा आणि मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे. यासाठी दबाव आणला जात होतो. याला अक्षय करांडे यांनी तीव्र विरोध केला. विशेष म्हणजे, सौभाग्यवती स्थायी समितीची सदस्या असतानाही त्यांना संघर्ष करावा लागला. यावर योग्य आणि रास्त भूमिका घेत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी हा विषय केवळ रद्द न करता, नागरिकांच्या मागणीनुसार सदर जलतरण तलाव अन्य ठेकेदाराला तात्पुर्ता सुरू करण्याबाबत काम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असून, चुकीच्या कामाला लगामसुद्धा बसला आहे.
आमच्या प्रभागात चुकीचे काम होवू नये, यासाठीच आम्ही या कामाला विरोध केला. नागरिकांची गैरसोय होवू नये. या करिता प्रशासनाने माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलाव चालवण्याची जबाबदारी स्वत: घ्यावी. स्थायी समितीने हा विषय रद्द केला. तसेच, नवीन निविदा राबवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याबद्दल सभापती अभिषेक बारणे आणि सदस्यांचे आम्ही आभारी आहोत.
– अक्षय करांडे, सामाजिक कार्यकर्ते, यमुनानगर.





