बँक लॉकरमधून लाखोंचे दागिने गायब झाल्यावर किती नुकसान भरपाई मिळते? अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केला नियम

नवी दिल्ली : “बँकेच्या चुकीमुळे लॉकरमधील वस्तूंचे नुकसान झाले किंवा चोरी झाली, तर बँक नियमानुसार ग्राहकांना लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट इतकी ठराविक रक्कम भरपाई म्हणून देते. एखाद्याला जास्त नुकसान भरपाई हवी असेल, तर त्याला लॉकरमध्ये काय आहे हे बँकेला सांगावे लागेल. मात्र, बँकिंग नियम अशा प्रकारे वस्तूंची माहिती उघड करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे बँक लॉकर ग्राहकांना नुकसानीच्या परिस्थितीत एका ठराविक मर्यादेपर्यंतच आर्थिक संरक्षण मिळते,” असे आज (दि. २९) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
ग्राहक बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान साहित्य ठेवतात. पण हीच वस्तू गहाळ झाल्यास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट भरपाईच का दिली जाते, असा सवाल गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी विचारला होता. याला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, ग्राहक आपल्या लॉकरमध्ये नेमके काय आणि किती किमतीचे दागिने किंवा कागदपत्रे ठेवत आहेत याची माहिती बँकेला नसते. ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची माहिती देण्यास सांगणे हे बँकिंग गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन ठरते.
हेही वाचा – जमिनींची मोजणी सुपरफास्ट, सरकारकडून खासगी भूमापकांची नियुक्ती
ग्राहकांच्या प्रत्येक वस्तूची किंमत ठरवणे किंवा स्वतंत्र विमा काढणे व्यावहारिकदृष्ट्या कठीण असते. म्हणूनच, सर्वांसाठी एकच भरपाईचा नियम लागू केला जातो. त्यामुळेच सर्व ग्राहकांसाठी एक ‘प्रमाणित भरपाई आराखडा’ करण्यात आला आहे, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.
एखाद्या ग्राहकाने अधिक भरपाईची मागणी केली, तर त्याला लॉकरमधील साहित्याचा खुलासा करावा लागेल. मात्र, बँकिंग नियम अशा प्रकारच्या खुलाश्याची परवानगी देत नाहीत. म्हणूनच भरपाईची मर्यादा वार्षिक भाड्याच्या १०० पट इतकी निश्चित करण्यात आली आहे. या नियमामुळे ग्राहकांच्या साहित्याची गोपनीयता जपली जात असली, तरी नुकसानीच्या परिस्थितीत एका ठराविक मर्यादेपर्यंतच आर्थिक संरक्षण मिळणार असल्याचेही अर्थमत्र्यांनी स्पष्ट केले.





