‘बॅनरवरील फोटोतून आमची निष्ठा ठरवू नये, आमचे कान पकडण्याचा अधिकार सुनेत्राकाकींना’; मंत्री अदिती तटकरे

Aditi Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघांमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे यांच्या सोबतच मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमसाठी लावलेला पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नसल्याचे दिसत आहे. यावरुन खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अदिती तटकरे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये असे अदिती तटकरे म्हणाल्या.
स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे.
हेही वाचा – ई-केवायसी केली तरच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन, अन्यथा एप्रिल, मे महिन्याचे वेतन नाही
बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये, असे अदिती तटकरे म्हणाल्या. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच असे अदितीतटकरे म्हणाल्या.
ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करु नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, प्रोटोकॉल असं ट्वीट करत अमोल मटकरी यांनी नाव न घेता सुनिल तटकरे यांना टोला लगावलाय.





