पुण्यातील भोर प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मृत्यूदंडाच्या शिक्षेची करणार मागणी

Devendra Fadnavis : पुण्यातील भोर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी ६५ वर्षीय संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरते आहे. या घटनेनंतर नसरापूर परिसरात नागरिकांनी रास्ता रोको केला होता. तर, आजही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगार्याखाली पूरल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. या भागातील नागरिकांनी पुणे सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
हेही वाचा – स्वयंपाकाच्या गॅसचे भाव आवाक्याबाहेर! घरगुती सिलेंडर ४० ते ५० रुपयांनी महाग होणार; जाणून घ्या दर
या घटनेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक घटना आहे. आरोपीला अटक झाली आहे. आरोपीचे अशाप्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेतून समाजातून मोठा रोष आहे. सर्वांना या घटनेमुळे पीडित मुलीच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटतेय. आरोपीला अटक केली आहे, मी आश्वस्त करू इच्छितोो की फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण नेऊ. स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हाय कोर्टाला विनंती करू. विशेष सरकारी वकील देऊन आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करणार आहोत.
दरम्यान, याप्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याची टीका विरोधकांनी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे अत्यंत असंवेदनशील आहे. प्रत्येक गोष्टी राजकारण शोधून काढणं, यापेक्षा वाईट काही असू शकत नाही. काही गोष्टीत संवेदनशीलता पाळली पाहिजे. राज्य सरकारने जे करणं अपेक्षित आहे, ते नक्की करणार. “





