ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या देखभालीसाठी मुदतवाढ प्रस्ताव

महापालिका क्रीडा समिती सदस्य उदय गायकवाड यांची सविस्तर माहिती

पिंपरी-चिंचवड | स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतीकारक चापेकर बंधू यांच्या स्मृती जतन करण्यासाठी चिंचवडगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या स्वच्छता, देखभाल व देखरेख कामकाजासाठी नियुक्त मनुष्यबळास मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव क्रीडा व सांस्कृतिक समितीसमोर ठेवण्यात आला असल्याची सविस्तर माहिती क्रीडा समिती सदस्य उदय गायकवाड यांनी दिली.

गायकवाड यांनी सांगितले की, या संग्रहालयाचे लोकार्पण १८ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले असून मे २०२५ पासून संग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. चिंचवडगावातील चापेकर बाडा येथे उभारण्यात आलेले हे संग्रहालय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जतन करणारे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.

मा. आयुक्तांच्या आदेशानुसार संग्रहालयाचे प्रशासकीय व्यवस्थापन क्रीडा विभागाकडे सोपविण्यात आले आहे. तसेच भविष्यात संग्रहालयाचे अधिक सक्षम व व्यावसायिक पद्धतीने संचालन करण्यासाठी कंपनी कायदा २०१३ अंतर्गत ना-नफा तत्वावर स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून महानगरपालिका व चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही कंपनी स्थापन होणार आहे.

हेही वाचा        :            पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; लोणावळा घाटात ४–५ किमी वाहनांच्या रांगा 

दरम्यान, संग्रहालयाच्या दैनंदिन स्वच्छता, देखभाल व देखरेख कामासाठी मे. राजमाता अहिल्यादेवी होळकर स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, यमुनानगर यांच्याकडे १ पर्यवेक्षक व ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या कामासाठीचा करार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपुष्टात आला आहे. मात्र संग्रहालय नियमित सुरु असल्याने स्वच्छता व देखभाल सेवा अखंडित ठेवणे अत्यावश्यक आहे.

पद्मश्री गिरिश प्रभुणे यांच्या पत्रानुसार, कंपनी स्थापन होईपर्यंत किंवा किमान पुढील सहा महिन्यांसाठी या कर्मचाऱ्यांच्या सेवेला मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. कंपनी स्थापन प्रक्रियेस अद्याप कालावधी लागणार असल्याने (१ नोव्हेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६) या कालावधीसाठी अंतरिम स्वरूपात सेवा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

स्थायी व मुख्य सभेच्या मान्यतेची प्रतीक्षा..

नगरसेवक उदय गायकवाड यांनी पुढे सांगितले की, या कालावधीसाठी सुमारे ६ लाख ५६ हजार १९६ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च क्रीडा विभागाच्या विद्यमान अंदाजपत्रकातील “स्टेडियम, हॉल, नाट्यगृह परिसर स्वच्छता” या लेखाशिर्षांतर्गत करण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र अतिरिक्त आर्थिक तरतूद करावी लागणार नाही. संग्रहालयाची प्रतिमा, स्वच्छता व पर्यटकांचा अनुभव टिकवून ठेवण्यासाठी नियमित देखभाल अत्यंत महत्त्वाची असून सेवा खंडित झाल्यास नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे सदर प्रस्ताव दि. २७ रोजी होणाऱ्या क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून, त्यानंतर स्थायी समितीच्या मान्यतेने सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहितीही उदय गायकवाड यांनी दिली.

क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय हे आपल्या इतिहासाचा अभिमान आणि पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणची स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापन कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाही. कंपनी स्थापन होईपर्यंत आवश्यक त्या सर्व तात्पुरत्या उपाययोजना करून संग्रहालयाची गुणवत्ता आणि सुविधा अबाधित ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागरिकांना एक स्वच्छ, सुबक आणि दर्जेदार अनुभव मिळावा, यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.

– उदय गायकवाड, सदस्य, क्रीडा व सांस्कृतिक समिती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button