ज्येष्ठ नव्हे श्रेष्ठांचा सन्मान : तानाजी शिनगारे यांचा गौरव
आनंद मेळावा २०२६ मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

पुणे : समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, ज्ञान आणि संस्कार हा अमूल्य ठेवा मानला जातो. “ज्येष्ठ नव्हे श्रेष्ठांचा सन्मान” या भावनेतून नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे यांच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येत आहे.
याच उपक्रमांतर्गत आयोजित आनंद मेळावा २०२६ मध्ये आदर्श शिक्षक व माजी मुख्याध्यापक तानाजी सावळा शिनगारे यांना “ज्येष्ठ नव्हे श्रेष्ठांचा सन्मान” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन शिक्षणसेवेचा आणि समाजातील योगदानाचा गौरव करणारा ठरला आहे.
तानाजी शिनगारे यांनी सांगली जिल्ह्यातील हाय्यर एज्युकेशन सोसायटी संचालित शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत राहून मोलाची सेवा बजावली. मु.पो. सागांव, ता. शिराळा, जि. सांगली येथील समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
हेही वाचा – कोयली गावात आर्थिक साक्षरतेचा जागर; विद्यार्थ्यांना बचत व डिजिटल व्यवहारांचे मार्गदर्शन
शिनगारे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच दिले नाही, तर संस्कार, शिस्त आणि जीवनात प्रगती करण्याची प्रेरणाही दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या आयुष्यभराच्या शिक्षणसेवेचा हा योग्य गौरव मानला जात आहे. या सन्मानाबद्दल तानाजी सावळा शिनगारे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये योगदान…
तानाजी सावळा शिनगारे यांचे कार्य केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित असल्याचे दिसून येते. त्यांनी शिक्षणात ज्ञानासोबतच मूल्यसंस्कार, शिस्त आणि जीवनदृष्टी यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांना घडवले. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली पिढी केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम नसून सामाजिकदृष्ट्याही जबाबदार नागरिक म्हणून पुढे आली आहे. त्यांच्या कार्यातून आदर्श शिक्षकाची भूमिका ही समाजघडणीतील महत्त्वाची कडी असल्याचे स्पष्ट होते.





