खेड तालुक्यात जलक्रांतीचा नवा अध्याय : सिमेंट बंधाऱ्यांमुळे ३,४५० ग्रामस्थांना दिलासा
दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या या भागासाठी हा प्रकल्प आशेचा किरण

खेड, जि. पुणे | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील विरहाम, गारगोटवाडी आणि कंदवाडी या गावांमध्ये जल समृद्धी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या या भागासाठी हा प्रकल्प आशेचा किरण ठरत आहे.
या भागात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पाणी साठवणुकीच्या सुविधांचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. परिणामी, उन्हाळ्यात तीव्र टंचाई निर्माण होत होती. हीच समस्या ओळखून महिंद्रा अँड महिंद्रा लि. (इंजिन प्लांट, चाकण) आणि यश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नदी व ओढ्यांच्या पात्रात तीन सिमेंट बंधारे उभारण्यात आले.
विरहाम येथे ६० फूट, गारगोटवाडी येथे १०० फूट आणि कंदवाडी येथे ६० फूट लांबीचे हे बंधारे आता गावांसाठी जीवनरेषा ठरणार आहेत. या प्रकल्पामुळे तब्बल ३.१२ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून सुमारे १५५.७६ लाख लिटर भूजल पुनर्भरण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचा थेट लाभ सुमारे ३,४५० ग्रामस्थांना होणार असून ८५ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. यामुळे ९५ शेतकऱ्यांना दुसरे पीक घेण्याची संधी मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात सुमारे २० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधनासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा : पाकिस्तानी खेळाडूवरून वाद; सुनील गावस्करांचा सनरायझर्स हैदराबादवर हल्लाबोल

लोकार्पण सोहळ्यास महिंद्रा अँड महिंद्रा लि. चे प्लांट हेड संजय क्षीरसागर, डॉ. चंचल मेडतीया, सौ. स्मिता पिल्ले, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, ग्रामपंचायत प्रतिनिधी, सरपंच आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर गावांसाठी प्रेरणादायी प्रकल्प…
यावेळी बोलताना संजय क्षीरसागर म्हणाले, “सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण विकासासाठी महिंद्रा विविध उपक्रम राबवत आहे. जल समृद्धी प्रकल्पातील हे बंधारे गावासाठी आदर्श जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरतील.” या प्रकल्पात ग्रामस्थांनी श्रमदानातून सक्रिय सहभाग नोंदवला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. भविष्यात पाण्याचा जबाबदारीने वापर करून जलसंपदा जपण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. ग्रामस्थांनीही या प्रकल्पाचे मनापासून स्वागत करत, “बंधाऱ्यांमुळे भूजल पातळी सुधारेल, विहिरी आणि बोअरवेल वर्षभर पाण्याने भरलेले राहतील. त्यामुळे शेतीला मोठा आधार मिळून गावाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,” अशी आशावादी प्रतिक्रिया व्यक्त केली. जल व्यवस्थापनाचा हा यशस्वी नमुना खेड तालुक्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.





