पाकिस्तानी खेळाडूवरून वाद; सुनील गावस्करांचा सनरायझर्स हैदराबादवर हल्लाबोल

IPL 2026 | आयपीएल २०२६ पूर्वी सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी चर्चेत आली असून, द हंड्रेड २०२६च्या लिलावात पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला संघात घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत फ्रँचायझीच्या मालकांवर थेट टीका केली आहे.
सनरायझर्स फ्रँचायझीने द हंड्रेड स्पर्धेतील ‘सनरायझर्स लीड्स’ या संघाची १०० टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. या संघाने लिलावात अबरार अहमदला सुमारे २.३२ कोटी रुपयांत करारबद्ध केले. या निर्णयामुळे सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीच्या हैदराबाद फ्रँचायझीवर टीकेची झोड उठली आहे. संघाची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काव्या मारन हिच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, लिलावापूर्वी काही ब्रिटिश माध्यमांनी आयपीएलशी संबंधित काही फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडूंना संघात घेणार नाहीत, असा दावा केला होता. मात्र, सनरायझर्स फ्रँचायझीने हा ‘छुपा बंदी’चा पॅटर्न मोडत पाकिस्तानी खेळाडूला संधी दिल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
हेही वाचा : इराण शक्तीहीन…! युद्धाच्या पहिल्या दिवसांत डागत होता शेकडो मिसाईल, ड्रोन
गावस्कर यांनी ‘मिड-डे’मधील आपल्या लेखात स्पष्ट शब्दांत मत मांडताना सांगितले की, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनंतर आयपीएल फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना जवळपास पूर्णपणे दूर ठेवले आहे. भारतीय संस्थांकडून मिळणाऱ्या मानधनावर पाकिस्तान सरकारला कर मिळतो आणि त्या निधीतून शस्त्रसाठा उभारला जातो, त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारतीयांच्या जीवितास धोका निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले.
या निर्णयासाठी गावस्करांनी संघाच्या मालकांनाच जबाबदार धरले असून, मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांना कदाचित या पार्श्वभूमीची पूर्ण माहिती नसावी, असेही त्यांनी सूचित केले. “संघाचे मालक भारतीय असताना त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून हा निर्णय रोखायला हवा होता,” असे ते म्हणाले.
यासोबतच त्यांनी चाहत्यांनीही या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्याची शक्यता वर्तवली. “प्रेक्षकांनी सामन्यांकडे पाठ फिरवली तरी आश्चर्य वाटू नये,” असे म्हणत गावस्करांनी फ्रँचायझीने अजूनही निर्णय बदलण्याची संधी असल्याचे नमूद केले. एकूणच, सनरायझर्स हैदराबादच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात नवा वाद पेटला असून, आयपीएल २०२६पूर्वीच वातावरण तापल्याचे दिसत आहे.





