डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला ‘पीएमआरडीए’च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार!
पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार: डॉ. अभिजीत चौधरी

पिंपरी-चिंचवड, पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी सोमवारी (दि.9) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. चौधरी यांनी पुणे महानगर क्षेत्राच्या सुसूत्र नियोजनासह रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे व अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. अभिजीत चौधरी यांचा प्रशासकीय सेवेतील १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाहता, त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’च्या प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यातील समृद्ध, उद्योगक्षम आणि राहण्यायोग्य ‘सर्वांगसुंदर महानगर’ घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर, तसेच ग्रामीण भागातील वाढत्या शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून प्रभावी पावले उचलली जातील, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “पुणे रिंग रोड, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि टाऊन प्लॅनिंग स्कीम्स (टीपीएस) या महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असेल. तसेच नदी सुधार प्रकल्पासह आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. भूसंपादन तसेच परतावा जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, ते समन्वयाने मार्गी लावले जातील.”





