अधिकारी संभाजी ऐवले यांचे महिला व बालकल्याणचे अधिकार काढले, झगडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/download-9.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सर्व योजनांचे गेल्या वीस वर्षापासून कामकाज पाहणारे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांचे अधिकार या विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी काढून घेतले असून हे अधिकार सह समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांच्याकडे देण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजना नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे राबविल्या जातात. हजारो महिला लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला जातो. मध्यंतरी नागरवस्ती विकास योजना विभागाला सहायक आयुक्तच नव्हते. तेव्हा या विभागातील सर्व योजनांचे कामकाज समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले पाहत होते. मात्र, स्मिता झगडे यांनी या विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांची त्यांना अडचण होत असल्याची कुजबूज या विभागातील कर्मचा-यांमध्ये सुरू आहे. त्यामुळेच ऐवले यांचे महिला व बालकल्याण योजनांचे सर्वाधिकार काढून ते बहाद्दरपुरे यांच्याकडे दिल्याचे बोलले जात आहे.
महिला बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, सदस्या वैशाली काळभोर, आरती चोंधे यांनी झगडे यांच्या भूमिकेला विरोध करत अन्य सदस्यांसह आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर मला न विचारता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे हार्डीकरांनी त्यांना सांगितले. त्यावर सोमवारी (दि. 26) त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून खरी बाजू तपासली जाईल असे आयुक्त म्हणाल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.