प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शन

Republic Day 2026 Maharashtra Tableau: येत्या सोमवारी देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर लष्करी संचलन होते. यावेळी विविध राज्यांचे चित्ररथ भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथही (Maharashtra Tableau) सहभागी होणार आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर हा चित्ररथावर सजावट करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे दर्शन घडत आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोलताशे आणि गणपती बाप्पाची मूर्ती दिसत आहे. गणेशोत्सव आज असंख्य लोकांना आत्मनिर्भर बनवत आहे. यावरूनच गणेशोत्सव- आत्मनिर्भरतेचे प्रतिक ही संकल्पना चित्ररथातून सादर केली जाणार आहे.
या चित्ररथाबद्दल माहिती देताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी सांगितले की, यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भरता कशी आणली जाते, हे दाखवण्यात आले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रतील प्रमुख क्षण आहे. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. आत्मनिर्भर भारत या मोहिमेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी चालना मिळते, हा संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा –शिंदे सेनेकडून बालेकिल्ल्याची तटबंदी
या वर्षीच्या परेडमध्ये एकूण 30 चित्ररथ असणार आहेत. 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागातील चित्ररथाचा यामध्ये समावेश आहे. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत ही यंदाची थीम आहे. चित्ररथ कोणत्या राज्याचा सहभागी होणार यासाठी एक समिती निर्णय घेते. यामध्ये कलाकार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते सामिल असतात. प्रत्येक वर्षी आलटून पालटून राज्यांच्या चित्ररथांना परेडमध्ये समाविष्ट केले जाते. लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र येण्यासाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सवचे स्वरुप दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे. मुंबईसह राज्यातील असंख्य मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मूर्तीकार, सजावट करणाऱ्यांना मिळणारा रोजगार तसेच त्यातून तयार होणारी आर्थिक साखळी हा चित्ररथाचा मुख्य विषय असणार आहे. या राज्य महोत्सवाने आत्मनिर्भरतेला कशी चालना मिळते हे मांडले जाणार आहे.




