‘नवी मुंबई हे भविष्यातील आर्थिक केंद्र; या शहराच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘नवी मुंबई हे भविष्यातील आर्थिक केंद्र; या शहराच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : नवी मुंबई हे केवळ मुंबईचे विस्तारित स्वरूप नव्हे, भविष्यातील आर्थिक केंद्र आहे. महामुंबईच्या विकासाचा हा कणा असून देशाच्या पुढील आर्थिक वाटचालीत ‘ग्रोथ इंजिन’ची भूमिका बजावणार आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीनिमित्त नवी मुंबईतील खाडी मैदान, ऐरोली येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घडणाऱ्या भारतातील सर्वाधिक व्हायब्रंट शहरांपैकी नवी मुंबई एक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाषण अतीशय महत्वाचे ठरले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. नवी मुंबईच्या जडणघडणीत गणेश नाईक यांचे योगदान अतुलनीय असून हे योगदान विरोधकही मान्य करतात, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या या प्रवासात त्यांना राज्य सरकारनेही सातत्याने हातभार लावल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्याने गुंतवणूक वाढली असून शहर वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्याने नवी मुंबई-पनवेल-नैना चा परिसर हाच विकासाचे प्रमुख इंजिन बनत असल्याचे सांगत, भविष्यात या विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच नवी मुंबई विमानतळामुळे नैना परिसर तिसऱ्या मुंबईप्रमाणे विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –  भारत–जर्मनी ऐतिहासिक करार: इंडिया पोस्ट–डीएचएल ‘प्रीमियम इंटरनॅशनल एक्सप्रेस’मुळे निर्यात व ई-कॉमर्सला नवे बळ

भूमिपुत्र, झोपडपट्टीवासी आणि घरांच्या प्रश्नांवर सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत, १६ तारखेनंतर सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. १२.५ टक्के जमीन प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेत जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असे सांगत, भूमीपुत्रांच्या सातबाऱ्यावर सिडकोचे नाव काढून इथल्या भूमीपुत्रांचेच नाव लावले जाईल, या शब्दांत त्यांनी भूमिपुत्रांना आश्वस्त केले.

नवी मुंबईच्या विकासासाठी राज्य आणि केंद्रातर्फे सुरू असलेल्या विकासकामांचा पाढाच यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखवला. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अटल सेतूमुळे मुंबई-नवी मुंबईतील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगत, विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडोर, कळंबोली जंक्शन सुधारणा, कोस्टल रोड, खारघर-तुर्भे बोगदा आणि सिडकोच्या माध्यमातून नवीन ६९ कि.मी. ची मेट्रो अशा विविध प्रकल्पांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यामाध्यमातून नवी मुंबई मेट्रो थेट मुंबईशी जोडली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय जाहीर करत सर्व लोकल गाड्या बंद दरवाज्यांच्या आणि वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. विशेष म्हणजे सेकंड क्लास तिकिटांच्या दरात एक रुपयाही वाढ केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *