मुंबईत युतीसाठी जयंत पाटलांची उद्धव ठाकरेंबरोबर खलबतं; म्हणाले, “बरीच चर्चा झाली, पण…”

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मातोश्री’वर तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकनंतर जंयत पाटील यांनी ठाकरेंबरोबर जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, आमची चर्चा चालू आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाबरोबर चर्चा करण्यासाठीच मी मुद्दामहून आलो होतो. बरीच चर्चा झाली. पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाहीत. आम्ही महाविकास आघाडीतील घटक आहोत आणि म्हणून मुंबईत शिवसेनेशी आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.
काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) अशी महाविकास आघाडी मुंबईत एकत्र यावी अशी आमची धारणा होती. परंतु ते दोन मोठे पक्ष आहेत. आमच्या पक्षाची मुंबई शहरात त्या दोन पक्षांएवढी ताकत नाहीये. म्हणून आम्ही शिवसेनेबरोबर चर्चा करतोय. सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे, पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा – सेवा आणि सामूहिक अभिमानातून उभ्या राहिलेल्या लोकनेतृत्वाखालील चळवळीप्रमाणे NMIA चे उद्घाटन
भांडूप आणि विक्रोळीच्या काही जागांवर तिढा असल्याच्या चर्चेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मागच्या वेळी निवडून आलेले, त्या जागा आम्हाला सुटाव्यात असे पक्षाचे म्हणणे आहे आणि त्यासाठी चर्चा सुरू आहेत , असे जयंत पाटील म्हणाले.
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत याबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, ३० तारखेला अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस आहे. त्याआधी मी महाराष्ट्रातील सगळ्या शहरात कोण-कोणाशी युती करतंय याची माहिती घेतलेली नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत, त्या मताप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या महानगरपालिकांत करतोय, असे जयंत पाटील म्हणाले.




