“भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कुटुंबांचा नाही…”; गडकरींची घराणेशाहीच्या राजकारणावर टीका

Nitin Gadkari : आगामी पालिका निवडणुकीची तिकिटे सर्वेक्षणांच्या आधारे दिली जातील, असे केंद्रीय मंत्री नेते नितीन गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होतील, तर दुसऱ्या दिवसी मतमोजणी होणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले, इच्छुक उमेदवारांची चार सर्वेक्षण करण्यात आले आहेत. एक सर्वेक्षण माझ्याकडे आहे आणि तीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. तिकिटे फक्त सर्वेक्षणांवरच ठरवली जातील. नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस हे सर्वेक्षणाबाहेर काहीही करू शकत नाहीत. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कुटुंबांचा नाही. हा पती-पत्नी, वडील आणि पुत्रांचा पक्ष नाही.
हेही वाचा – मुंबईत युतीसाठी जयंत पाटलांची उद्धव ठाकरेंबरोबर खलबतं; म्हणाले, “बरीच चर्चा झाली, पण…”
राजकारण हा पैसे कमविण्याचा व्यवसाय नाही. एका प्रभागात पती, पत्नी, मुलगा आणि बहीण या सर्वांनी तिकिटे मागितली. फक्त ड्रायव्हर आणि नोकर शिल्लक आहेत. जर एखाद्याला तिकीट मिळाले नाही तर निराशा होणारच, परंतु अधिक जागा जिंकण्याचे मोठे ध्येय कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले आहेत.





