शहरात मनसेची जोरदार चर्चा; उमेदवारी फॉर्मसाठी इच्छुकांची लगबग
मिशन- PCMC: “मनसे सक्षम नेतृत्व देण्यासाठी सज्ज”

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांची राजकीय धामधूम दिवसेंदिवस वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) उमेदवारी अर्ज वितरणाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनसेकडून आजपासून अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू होताच अवघ्या एक तासात विविध प्रभागांमधून तब्बल ५० अर्ज इच्छुकांनी घेतले. या प्रतिसादामुळे मनसेच्या उमेदवारी फॉर्मसाठी शहरात उत्साहाची लाट उसळल्याचे चित्र दिसून आले. पुढील काही दिवसांत हा आकडा आणखी वाढणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
निवडणुका जवळ येत असताना मनसेकडून शहरभर बैठकींचा सपाटा लावण्यात आला आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे शहराचे मनसे सरचिटणीस संजय भोसले, ऍड. उपेंद्र शेडगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उमेदवारी नियोजन, बी.एल.ओ.-बी.एल.ए. नेमणूक, बूथबांधणी, तसेच निवडणूक व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा – देशाला हादरवून सोडणाऱ्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक, नागरी आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून मनसेची प्रतिमा गेल्या काही वर्षांत अधिक भक्कम झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत मनसे जोरदार तयारी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“शहरातील विकास, सामाजिक प्रश्न, पर्यावरण, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजकारणात पुढे यावे यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. समाजासाठी काम करणारे ऍडवोकेट, डॉक्टर, साहित्यिक, पत्रकार, कलाकार, निसर्गप्रेमी यांनीही मनसेकडून निवडणूक लढवावी, अशी आमची अपेक्षा आहे. तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अग्रस्थानी आणणे हे मनसेचे ध्येय आहे. राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत.”
– सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे.




