सरकारचा शब्दभंग : कस्पटे वस्ती, वाकडकरांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन
भाजपाचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांचा लढा : सरकारी भूखंड बिल्डरला देण्याच्या निर्णयाविरोधात संताप
पिंपरी-चिंचवड: वाकड, पेठ क्र. ३८/३९ — कस्पटे वस्ती तील नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या शासननिर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांचे आंदोलन तीव्र होत आहे. विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान दिलेले आश्वासन पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, या आंदोलनाला आम आदमी पार्टीने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथील मैदानावर नागरिकांना विरंगुळा केंद्र, खेळाचे मैदान आणि उद्यान उभारण्याची हमी दिली होती. नागरिकांसाठी राखीव असलेला हा बहुमोल भूखंड सार्वजनिक सुविधांसाठी वापरण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर हा भूखंड खासगी बिल्डरला देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर परिसरात संताप उसळला आहे.
या निर्णयाच्या विरोधात माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी जोरदार निषेध आंदोलन सुरू केले असून निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “दिलेला शब्द पाळला जाईपर्यंत लढा सुरूच राहील!”
आम आदमी पार्टीचा पाठिंबा — शहराध्यक्ष रविराज काळे यांची प्रतिक्रिया
आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले, “स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर अन्याय करणारा हा निर्णय आम्ही कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाही. जनतेसाठी राखीव जमीन बिल्डरला देणे म्हणजे लोकशाहीला हरताळ फासणे होय. आम आदमी पार्टी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या लढ्यात नागरिकांसोबत ठामपणे उभी राहील.”
स्थानिकांचे म्हणणे एकच — “जनतेचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही!” सरकारने निर्णय मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका नागरिकांनी स्पष्ट केली आहे.




