गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ध्येय असावे – डॉ दीपक शहा
शिक्षण विश्व: आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत शिक्षकांना डॉ. शैलेश गुजर यांच्याकडून मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड : शिक्षक दिन केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षातील सर्व ३६५ दिवस साजरा व्हावा, असे मत कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील संस्थेच्या प्रांगणात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन, गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारून कार्यक्रमात रंग भरले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ शहा होते. प्रमुख वक्ते म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ शैलेश गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी व्यासपीठावर शिक्षणतज्ञ धनंजय कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, संस्थेच्या खजिनदार डॉ भूपाली शहा, संचालिका डॉ तेजल शहा, प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, डॉ पौर्णिमा कदम, डॉ वनिता कुऱ्हाडे, वृंदा जोशी, एमबीए विभागाचे संचालक डॉ सचिन बोरगावे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
डॉ शहा पुढे म्हणाले की, प्रतिभा महाविद्यालयाने अल्पावधीतच शहरात स्वतःचा ठसा उमटवला आहे. हे यश येथील प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत बाह्यजगाची अद्ययावत माहिती मिळावी व त्यांचे सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्थेने नेहमीच प्रयत्न केले आहेत.
शिक्षणतज्ञ धनंजय कदम यांनी केंब्रिज कोर्सेस, इंग्रजी भाषेचे महत्त्व आणि त्यावरील प्रभुत्व या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर संवाद साधण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ शैलेश गुजर, डॉ दीपक शहा आणि डॉ भूपाली शहा यांच्या हस्ते पीएचडी प्राप्त केलेले डॉ रोहित आकोलकर, डॉ शबाना शेख यांचा तसेच सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रा. प्रीती जगताप आणि प्रा. रूपाली नानकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावून एक वेगळी शिकवण दिली. तबस्सूम शेख हिने प्राचार्याची भूमिका यशस्वीरित्या पार पाडली. तिचा सत्कार डॉ राजेंद्र कांकरिया, डॉ क्षितिजा गांधी व डॉ जयश्री मुळे यांनी केला.
प्रसंगी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. याचे आयोजन प्राचार्या वृंदा जोशी, उपमुख्याध्यापिका लीजा सोजू व शिक्षिका गुलनाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे यांनी, प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. सुप्रिया गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल शिंदे यांनी केले.
शिक्षकांनो, स्वतःला सिद्ध करा – डॉ शैलेश गुजर
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ शैलेश गुजर यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्याचे तंत्रज्ञान असून, शिक्षण क्षेत्रात त्याचा प्रभाव लवकरच दिसू लागेल. शाळा-महाविद्यालयांमध्ये रोबोट्स शिक्षण देऊ लागतील का, हा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी जो शिक्षक सतत ज्ञानार्जन करेल, संशोधन करेल व स्वतःला सिद्ध करेल, तोच भविष्यात टिकेल. त्यामुळे शिक्षकांनी वेळेचे भान ठेवत आपले कौशल्य वाढवले पाहिजे, असे ते म्हणाले.





