७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा जल्लोषात; व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये देशभक्तीचा उत्साह!
विद्यार्थ्यांचे बॅंड, समूहगान आणि कथाकथनाने मन जिंकले
पिंपरी-चिंचवड: मोरया शिक्षण संस्थेच्या व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात, देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा विश्वस्त श्री. स्वप्निल शेडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी प्रांजल जाधव व डॉ. राजेश्वर हेंद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने झाली. यानंतर ध्वजारोहण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ध्वजाला सलामी दिली. राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीतांचे सुमधुर गायन काव्या साताळकर, अनुष्का लोहार व शार्दुल देशिंगे यांनी पेटी व तबल्याच्या साथीने सादर केले. प्रतिज्ञावाचन श्री. हनुमंत हुचगोळ यांनी केले.
शाळेच्या एमसीएफ, स्काऊट आणि गाईड पथकांनी संचलनाद्वारे उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. संचलनाचं नेतृत्व तनिष्का भालेराव, माहेश्वरी फाटक, आयुष जाधव आणि अविष्कार बदर यांनी केले.
शाळेच्या प्राचार्या व कार्यवाह सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात देशप्रेम आणि देशभक्तीवर प्रभावी मार्गदर्शन केलं. त्यानंतर डॉ. राजेश्वर हेंद्रे लिखित “अव्यक्त भावपत्रे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पालकांच्या मनातील भावनांना लेखनाच्या माध्यमातून मांडणाऱ्या या पुस्तकाची माहिती प्राचार्यांनी दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समुहगानांनी आणि अविष्कार बदरच्या उत्कृष्ट कथाकथनाने उपस्थितांची मने जिंकली. पाहुण्या कुमारी प्रांजल जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला – “कोणतीही गोष्ट अवघड असली, तरी ती अशक्य नसते; प्रयत्न, जिद्द व चिकाटी याच यशाची किल्ली आहेत.”
देशभक्तीपर संस्कारांची साक्ष…
विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. स्काऊट मास्टर श्री. हनुमंत हुचगोळ, श्री. अनिल तिटकारे आणि गाईड कॅप्टन सौ. अनिता बोरसे यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष ऊर्जा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेचे कार्यकारी सदस्य सौ. प्रतिभा कुलकर्णी, श्री. देव, खजिनदार श्री. रणजीत सावंत, उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत, शिक्षक समन्वयक श्री. संजय खेडकर व पर्यवेक्षिका मैत्रेयी राजे यांचे योगदान मोलाचे होते. सूत्रसंचालन श्री. पंकज देव व श्री. हनुमंत हुचगोळ यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मैत्रेयी राजे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, नेटका आणि उत्साहात पार पडत शाळेच्या देशभक्तीपर संस्कारांची साक्ष देत गेला.





